माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी इन्फोसिस टेक्नॉलॉजीजने बाजार विश्लेषकांचे कयास फोल ठरवीत, आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये डॉलरमध्ये कमावल्या जाणाऱ्या महसुलात ७% ते ९% अशी वाढ होईल, असे निर्देश दिले आहेत. तथापि सरलेल्या २०१३-१४ सालात साधलेल्या ११.५ टक्के वाढीच्या तुलनेत घट दाखविणारेच हे निर्देश असले तरी, एकंदर अपेक्षेपेक्षा ते सरस असल्याने त्या संबंधाने सुखद आश्चर्य व्यक्त करण्यात आले. शिवाय मार्च तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात तुलनेने वाढ झाली नसली तरी नफ्याचे प्रमाण चांगले आल्याची सकारात्मक प्रतिक्रिया म्हणून मंगळवारी शेअर बाजारात इन्फोसिसच्या समभागाने ४.२ टक्क्यांपर्यंत झेप दाखविली. समभागातील ही सरशी नंतर ओसरून सोमवारच्या तुलनेत अवघ्या पाऊण टक्के वाढीवर स्थिरावली.
इन्फोसिसने प्रसिद्ध केलेल्या जानेवारी ते मार्च २०१४ तिमाहीच्या वित्तीय निकालात, १२,८७५ कोटी रुपयांच्या उत्पन्नावर, २,९९२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. अमेरिकी डॉलरच्या रूपात मार्च तिमाहीतील महसूल २,०९२ दशलक्ष डॉलर इतका आहे. याआधीच्या म्हणजे डिसेंबर तिमाहीत कंपनीने कमावलेल्या २१०० दशलक्ष डॉलरच्या महसुलाच्या तुलनेत यंदा ते जैसे थे राहिले आहे.
इन्फोसिसचे मुख्याधिकारी व व्यवस्थापकीय संचालक एस. डी. शिबूलाल यांनीही आर्थिक वर्षांतील अंतिम म्हणजे मार्च तिमाहीतील कामगिरी फारशी उत्साहवर्धक नाही, याची कबुली पत्रकारांशी बोलताना दिली. आधीच्या तिमाहीतील इन्फोसिसची कामगिरी गुंतवणूकदार जगतासाठी आश्चर्यकारक ठरली होती, पण यंदा प्रत्यक्ष निकालांपेक्षा आगामी वर्षभरावर नजर ठेवून कंपनीकडून दिले जाणारे निर्देश गुंतवणूकदारांच्या दृष्टीने उत्सुकतेचे ठरले होते. विशेषत: महसुली वाढीबाबत सहा टक्क्यांपेक्षा खालचे इन्फोसिसच्या व्यवस्थापनाने कयास व्यक्त केल्यास, ते बाजाराच्या दृष्टीने खूपच नकारात्मक ठरेल, असे सर्वच विश्लेषक या निकालाच्या पाश्र्वभूमीवर म्हणत होते. प्रत्यक्षात शिबूलाल यांनी २०१५ सालातील महसुली वाढ ७ ते ९ टक्क्यांदरम्यान राहण्याचे भाकीत वर्तविले आहे. व्यवसायात वृद्धीस आवश्यक तेवढी गुंतवणूक करून हे साध्य केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ठळक वैशिष्टय़े:
* २०१३-१४ संपूर्ण वर्षांसाठी ५०,१३३ कोटी रुपयांची महसुली कमाई नोंदवून, इन्फोसिसने प्रथमच वार्षिक महसुलात ५० हजार कोटींचा टप्पा ओलांडला.
*  भागधारकांना प्रति समभाग ४३ रु. अंतिम लाभांश
*  इन्फोसिस व तिच्या उपकंपन्यांनी संपूर्ण वर्षांत २३८ नवीन ग्राहक मिळविले.
*  संपूर्ण वर्षांत ३९,९८५ नवीन कर्मचाऱ्यांना सेवेत सामावण्यात आले.
*  ३१ मार्च २०१४ अखेर कंपनीचे एकूण मनुष्यबळ १६०,४०५ वर