गेल्या पाच वर्षांत २०-२५ टक्क्य़ांच्या वृद्धीदराने वाढत असलेला जीवन विमा उद्योग सध्याच्या ५५ अब्ज डॉलर्सवरून वाढत जाऊन येत्या तीन वर्षांत १०० अब्ज डॉलर्सचा होईल अशी आशा आहे. सातत्याने सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा, वाढलेले उत्पन्न आणि स्थावर मालमत्तेकडून उत्पादक वित्तीय गुंतवणुकीकडे झुकलेला कल यासारख्या गोष्टींमुळे वृद्धीचा वेग कायम राहण्यास मदत मिळणार आहे. तसेच विम्याच्या व्याप्तीचे प्रमाण ३.५ टक्क्य़ांच्या जागतिक सरासरीच्या तुलनेत भारतात केवळ २.७ टक्के आहे हेही लक्षात घ्यायला हवे. उद्योगातील अंतर्गत काही घटक जसे वितरण जाळ्याचा विकास, उत्पादन-नावीन्य, डिजिटल बदल, भांडवली गुंतवणूक आणि उद्योगांचे सुरू असलेले ग्राहककेंद्री प्रयत्न वगैरेंचाही एकत्रित परिणाम दिसून येईल.

  • वितरण जाळे

धोरणात्मक वितरण जाळे उदा. एजन्सी आणि बँक अश्युरन्स सहयोग वाढविण्यावर भर दिला जाईल. पॉइंट ऑफ सेल (पीओएस) आणि डिजिटल वितरण जाळे यासारख्या नव्या व उदयोन्मुख वितरण जाळ्यांमुळे वितरण व्यवस्थेला अधिक खोलवर पोहोचण्यास मदत मिळेल. ‘आयआरडीएआय’ने स्थापन केलेली उत्पादन नियमन समीक्षा समितीने इतर काही उपायांसोबत वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी काही पर्याय सुचविले आहेत.

  • उत्पादन-नावीन्य

विमा कंपन्यांना सातत्याने त्यांच्या उत्पादनांची पडताळणी करावी लागते आणि सर्व प्रकारची उत्पादने व विविध प्रकारच्या ग्राहकांना वीमा संरक्षण मिळेल याची काळजी घ्यावी लागते. नवनवीन उत्पादने व ती अधिक सोपी केल्याने अधिक ग्राहक आकर्षिले जातात, हे विमा कंपन्या अनुभवतच आहेत. पूर्ण संरक्षण देणाऱ्या टर्म इन्श्युरन्स योजनांबाबत ग्राहकांमध्ये वाढत असलेल्या जागरूकता हेही जीवन विमा कंपन्यांसाठी वैशिष्टय़पूर्ण ठरले आहे. याशिवाय, ज्या ठिकाणी जीवन विमा कंपन्या नाहीत त्या क्षेत्रात त्यांना प्रवेश करण्याची मुभा दिली तर त्यांना उत्पादनांचा विस्तार करण्यास आणि अधिकाधिक लोकांपर्यंत विमा योजना पोहोचविण्यास मदत मिळेल. विमा योजनेच्या रचनेत आणि नव्या योजनांना मंजुरी प्रक्रियेत अधिक कार्यक्षमता आणण्याचा नियामकांचा प्रयत्न आहेच. या गोष्टींमुळे नजीकच्या भविष्यात बाजारपेठेत विस्तार अधिक वेगाने होऊ  शकेल.

  • डिजिटल बदल

इंटरनेटचा वाढता वापर आणि डिजिटल इंडिया, यूपीआयसारख्या सरकारच्या उपक्रमांमुळे डिजिटल तंत्रज्ञानाची स्वीकारार्हता वाढली आहे. ‘डिजिटल’ हा दोन प्रकारे आयुष्याचा भाग होणार आहे- डिजिटल माध्यमाद्वारे ग्राहकांना उत्पादनांचा सर्वदूर पुरवठा आणि दुसरे म्हणजे प्रक्रियेत सुधारणा घडवून आणली जाईल. यामुळे ग्राहकांना अधिक चांगला अनुभव मिळेल व खर्चात कपात होईल. दोन्ही गोष्टींनी परिणाम दाखविणे सुरू केले असले तरी पुढील काळात याला आणखी महत्त्व येईल. आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर करणारे सॉफ्टवेअर (उदा. ई-मेल बॉट, चॅट बॉट) मनुष्याच्या देखरेखीखाली किंवा देखरेखीशिवाय कार्य करतात. परिणामी येत्या काळात त्रुटींची संख्या शून्यावर आणू शकणार आहेत. आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या आधारे निर्णय घेऊन अंडररायटिंग तयार करणे व क्लेमवर प्रक्रिया करणे हे भविष्यात वेगवान होणार आहे.

  • भांडवल पुरवठा

सरलेले २०१७ वर्ष विमा क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचे ठरले असून मोठय़ा कंपन्यांच्या प्रारंभिक भागविक्रीतून (आयपीओ) २३ हजार कोटींहून अधिक निधी उभारला गेला. देशातील विमा उद्योगात असलेल्या वृद्धीच्या क्षमतेमुळे या भागविक्री आक्रमक किंमतीत झाल्या. (आशियातील इतर विमा कंपन्यांना अंतर्निहित मूल्याच्या एक ते दोन पट अधिक किंमत मिळाली तर भारतीय कंपन्यांच्या समभागांना मात्र तीन ते पाच पट मूल्यांकन मिळाले.)

माहिती आणि पारदर्शकता यामुळे या भागविक्रींद्वारे ग्राहकांमध्ये जागृती वाढली आहे आणि यामुळे उद्यम कारभारही सुधारणार आहे. हे ग्राहकांच्या हिताचेच ठरणार आहे. भागविक्रीपलीकडे विचार करता खासगीकरणानंतर पहिल्या दशकात ज्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक झाली त्या तुलनेत आता भांडवल गुंतविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कारण उद्योगाचा कल नफ्यात येण्याकडे आणि सध्याचे भांडवलाच्या विनियोगावर भर आहे. हळूहळू या क्षेत्राचे सुदृढीकरण होईल आणि फारशा गंभीर नसलेल्या कंपन्या बाहेर पडतील व दीर्घकाळासाठी प्रतिबद्ध असलेल्या कंपन्याच शिल्लक राहतील आणि वाढतील.

  • ग्राहककेंद्री कल

एकंदर विमा उद्योगाचा ग्राहकांवर लक्ष केंद्रित करण्याचा कल मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. ज्यामुळे चांगल्या योजना, सेवा गुणवत्ता, सातत्य, दावे निकाली काढण्याचे वाढलेले प्रमाण दिसण्याबरोबरच, लोकांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. येत्या काळातही अभिनव योजना व डिजिटल बदल ग्राहकांना मिळणारा अनुभव अधिकाधिक संपन्न करणार आहे. यापूर्वी नव्हता इतक्या मोठय़ा प्रमाणात ग्राहक हा विमा कंपन्यांच्या वृद्धी योजनांच्या केंद्रस्थानी असणार आहे. हीच गोष्ट येत्या काही वर्षांत या उद्योगाचा चेहरामोहरा ठरविणार आहे.

– सुरेश अग्रवाल

(लेखक कोटक लाइफ इन्शुरन्सचे मुख्य वितरण अधिकारी)