मुंबई : दीघरेद्देशी संपत्ती निर्माणाचे उद्दिष्ट असल्यास, बाजारातील अल्पकालिक चढ-उतारांकडे पूर्ण डोळेझाक करणे आणि तुलनेने जोखीम कमी असलेल्या लार्ज कॅप फंडात नियोजनबद्धरीत्या अर्थात ‘एसआयपी’ पद्धतीने गुंतवणूक करणे हाच सर्वोत्तम पर्याय ठरेल.

‘सेबी’कडून नव्याने केल्या गेलेल्या म्युच्युअल फंडांच्या सुसूत्रीकरणानुसार, लार्ज कॅप फंडांना त्यांच्या मालमत्तेतील किमान ८० टक्के हे लार्ज कॅप कंपन्यांशी संलग्न समभाग अथवा समभागसदृश साधनांमध्ये गुंतवणूक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर भांडवली बाजारात एकूण बाजार भांडवलाच्या दृष्टीने पहिल्या १०० कंपन्यांना लार्ज कॅप कंपन्या म्हटले गेले आहे. त्या त्या उद्योगक्षेत्रात नेतृत्वस्थानी असलेल्या उत्तम पूर्व-इतिहास आणि सशक्त कामगिरी असलेल्या या कंपन्या दीर्घ मुदतीत सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करण्याची शक्यता लक्षात घेता, त्यांच्या समभागात तुलनेने अस्थिरता कमी असते, असे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी निमेश शाह यांनी सांगितले.

लार्ज कॅप फंडांचा तीन वर्षे, पाच वर्षे, सात वर्षे आणि १० वर्षे कालावधीतील या फंडांचा चलत सरासरी परतावा हा संदर्भ निर्देशांकांपेक्षा पावणेदोन ते तीन टक्क्यांपेक्षा अधिक राहिला आहे.

दीर्घ मुदतीत सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करण्याची शक्यता आणि तुलनेने कमी अस्थिरता आणि जमेला दमदार लाभांश परतावाही गृहीत धरल्यास, दीर्घ मुदतीत चांगल्या संपत्ती निर्माणासाठी कोणत्याही बाजारस्थितीत लार्ज कॅप फंडातील गुंतवणूक निश्चितच फायद्याची ठरते.

’  निमेश शाह,

मुख्याधिकारी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड