मुत्थूट फिनकॉर्पची ११.०३ टक्के व्याज लाभ देणारी रोखे विक्री

मुंबई : मुत्थूट पापाचन समूहातील प्रमुख बँकेतर कंपनी मुत्थूट फिनकॉर्पने गुंतवणूकदारांना ११.०३ टक्के व्याजदराचा लाभ देणारे अपरिवर्तनीय रोखे (एनसीडी) विक्रीला खुले केले आहेत. १,००० रुपये दर्शनी मूल्याच्या रोख्यांमध्ये किमान १०,००० रुपयांची (१० रोख्यांसाठी) आणि त्यापेक्षा अधिक गुंतवणूक करता येईल. २० सप्टेंबरला सुरू झालेली ही रोखे विक्री १८ ऑक्टोबपर्यंत सुरू राहील.

मुत्थूट फिनकॉर्पने या रोखे विक्रीतून २५० कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. अधिक भरणा झाल्यास ५०० कोटी रुपये उभारण्याचा पर्याय कंपनीकडे आहे. या निधीतून आवश्यक भांडवली उभारणीसह, ग्राहकांच्या कर्ज गरजांची पूर्तता केली जाणार आहे, असे कंपनीचे अध्यक्ष थॉमस जॉन मुत्थूट यांनी स्पष्ट केले. कंपनीच्या संचालक मंडळाने रोखे विक्रीतून एकूण ९०० कोटी रुपये उभारण्याची मंजुरी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

गुंतवणूकदारांना या रोख्यांमध्ये विविध आठ पर्याय दिले आहेत, ज्यांचा मुदत कालावधी ४०० दिवस, दोन वर्षे आणि तीन वर्षे असा असून, देय व्याजाचा दर ९.३८ टक्क्यांपासून कमाल ११.०३ टक्क्यांपर्यंत आहे. जो अर्थातच सध्याच्या बँकांच्या घसरत्या मुदत ठेवींवरील व्याजदरापेक्षा खूपच आकर्षक आहे. ब्रिकवर्कने या रोख्यांना ‘ए’ असे पतमानांकन बहाल केले आहे. मध्यम तसेच निम्म उत्पन्न गटावर केंद्रीय या बँकेतर वित्तीय कंपनीच्या देशभरात ३,५५१ शाखांचे जाळे पसरले आहे.

अ‍ॅक्सिस निफ्टी १०० इंडेक्स फंड गुंतवणुकीस खुला

मुंबई : अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाने आपला नवीन फंड- अ‍ॅक्सिस निफ्टी १०० इंडेक्स फंड गुंतवणुकीस खुला केला आहे. फंडाचा ‘एनएफओ’ २७ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान खुला असून त्यानंतर या फंडाच्या युनिट्सची खरेदी दैनंदिन नक्त मालमत्ता मूल्यावर करता येईल.

निफ्टी १०० निर्देशांकांतील समभागांत गुंतवणूक करणारा हा ‘इंडेक्स फंड’ प्रकार अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाद्वारे पहिल्यांदाच सादर झाला आहे. या माध्यमातून गुंतवणूकदार सेबीद्वारे निश्चित केलेल्या संपूर्ण लार्ज कॅप समभागांच्या विश्वात निष्क्रियपणे सहभागी होऊ शकतो. या फंडाचे आशीष नाईक हे निधी व्यवस्थापक आहेत. या फंडातील गुंतवणुकीसाठी किमान रक्कम ५,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

इंडेक्स फंड हे जागतिक स्तरावर लोकप्रिय गुंतवणूक साधन असून भारतीय गुंतवणूकदारांची अलीकडच्या काळात या प्रकारच्या फंडात रुची वाढत आहे. इंडेक्स फंड ही एक गुंतवणुकीतील निष्क्रिय रणनीती आहे. या रणनीतीनुसार ‘निफ्टी १००’ निर्देशांकातील समभागांत त्यांच्या निर्देशांकातील प्रमाणानुसार समान गुंतवणूक करण्यात येईल. बाजाराच्या विशिष्ट विभागात सहभागी होण्यासाठी गुंतवणूकदारांना सर्वात कमी किमतीचा पर्याय इंडेक्स फंडामुळे उपलब्ध झाला आहे. ‘निफ्टी १००’ या निर्देशांकाने गेल्या १० आर्थिक वर्षांपैकी आठ वर्षे निफ्ट ५०  निर्देशांकाला परतावा कामगिरीत मागे टाकले आहे.

टय़ुटोरिअल्स पॉइण्टची भागविक्री बुधवापर्यंत खुली

मुंबई : इयत्ता सहावी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी ई-शिकवणी क्षेत्रातील हैदराबादस्थित कंपनी – टय़ुटोरिअल्स पॉइण्ट (इंडिया) लि.ने खुल्या प्रारंभिक समभाग विक्रीतून २०.१० कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. ३० सप्टेंबरपासून सुरू झालेली ही समभाग विक्री बुधवार, ४ ऑक्टोबरला बंद होणार आहे. कंपनीने प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याचे समभाग हे प्रत्येकी ६० ते ६४ रुपयांच्या किंमत पट्टय़ात बाजारात आणले आहेत. ही ‘एसएमई’ श्रेणीतील कंपनीची भागविक्री असून, विक्रीपश्चात समभागांची ‘बीएसई एसएमई’ व्यासपीठावर सूचिबद्धता होईल. भागविक्रीचे व्यवस्थापन होलानी कन्सल्टंट्स प्रा. लि.कडे आहे. विद्यार्थ्यांसाठी ई-टय़ुटोरिअल कण्टेण्टची निर्मिती, विकास व विपणन त्याचप्रमाणे आयटी हार्डवेअर संपादित करण्यासह सामान्य खर्चाची पूर्तता करणे हा या भागविक्रीतून निधी उभारण्याचा उद्देश आहे. ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या वर्षांसाठी कंपनीचा एकूण महसूल १०.३५ कोटी रुपये आहे, जो गेल्या वर्षांत ९.६४ कोटी रुपये होता. करोत्तर नफा ४.०३ कोटी रुपये आहे, जो गेल्या वर्षी ३.७० कोटी रुपये होता. कंपनीचे ई-लर्निग संकेतस्थळ ‘टय़ुटोरलपॉइण्ट डॉट कॉम’ हे जगातील अत्यंत लोकप्रिय व सुप्रसिद्ध ई-लìनग पोर्टल्सपैकी एक आहे. टॅब्लेटसह प्रीलोडेड कण्टेण्ट असणारा बायजूच्या धर्तीवरील नवीन टय़ुटोरिक्स नावाचा प्रकल्पदेखील कंपनीने सुरू केला आहे.

बॅलन्स्ड अ‍ॅडव्हाण्टेज फंडातून सरस परतावा

मुंबई : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये बॅलन्स्ड अ‍ॅडव्हाण्टेज वर्गवारी हा गुंतवणुकीचा पसंतीचा पर्याय ठरताना दिसत आहे. बाजारचक्राचा अंदाज घेत समभाग आणि रोखे संलग्न गुंतवणुकीचे संतुलन राखण्याचे धोरण हे या फंडाचे वेगळेपण राहिले आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या बॅलन्स्ड अ‍ॅडव्हाण्टेज फंडाने परतावा कामगिरीत निफ्टी निर्देशांकालाही मात दिली आहे.

आयसीआयसीआय प्रु. बॅलन्स्ड अ‍ॅडव्हाण्टेज फंडाने २५ सप्टेंबर २०१९ पर्यंत एक वर्ष कालावधीत ९.२३ टक्के, पाच वर्षांत ८.४० टक्के, तर १० वर्षांत ११.६० टक्के परतावा दिला आहे, असे अर्थलाभ डॉट कॉमकडून संकलित आकडेवारी दर्शविते. त्याच वेळी याच वर्गवारीतील अन्य फंडांची याच कालावधीतील सरासरी परतावा कामगिरी अनुक्रमे ६.८५ टक्के, ७.६५ टक्के आणि १०.१९ टक्के अशी आहे. या फंडांचा संदर्भ निर्देशांक असलेल्या ‘निफ्टी ५० टीआरआय’चा या कालावधीतील परतावा अनुक्रमे ४.७ टक्के, ९.०१ टक्के आणि १०.०५ टक्के असा आहे. त्यामुळे या फंडाने त्याच्या वर्गवारीत सर्वोत्तम परताव्यासह, संदर्भ निर्देशांकाच्या परताव्यावरही सरशी साधली आहे. उल्लेखनीय म्हणजे सरलेल्या ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान बाजार निर्देशांकाच्या दमदार उसळीनंतर, या फंडाने समभाग गुंतवणुकीतील प्रमाण कमी करून, या वर्गवारीसाठी निर्धारित किमान ३० टक्के पातळीवर आणले आहे. आयसीआयसीआय प्रु. बॅलन्स्ड अ‍ॅडव्हाण्टेज फंडाचा समभागातील सरासरी गुंतवणुकीची मात्रा ४७ टक्के अशी आहे.