बहुतांश ठिकाणी दुकाने सुरू; एका गटाकडून संप सुरूच

प्रस्तावित १ टक्का अबकारी कराला विरोधासाठी सुवर्णकारांनी सुरू केलेला संप १८व्या दिवशी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर बहुतांश ठिकाणी मागे घेण्यात आला असला तरी, देशात विशेषत: राजधानी दिल्ली आणि मुंबईतही काही ठिकाणी सराफांनी जोवर कर मागे घेतला जात नाही तोवर बेमुदत बंद सुरू ठेवला आहे. अर्थसंकल्पानंतर मंगळवारी २१व्या दिवशी दिल्लीतील बहुतांश दुकाने बंद राहिली.
जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी फेडरेशन (जीजेएफ), रत्न व आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषद (जीजेईपीसी) आणि इंडियन बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलरी असोसिएशन (आयबीजेए) या संपकर्त्यां सुवर्णकारांच्या तीन मोठय़ा संघटनांनी मात्र सरकारशी झालेल्या चर्चेबाबत समाधान व्यक्त करीत संप मागे घेण्याचे शनिवारीच आवाहन केले होते. तिन्ही संघटनांचे अनुक्रमे अध्यक्ष शंकर पंडय़ा, श्रीधर आणि मोहित कम्बोज यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या आठ तासांच्या चर्चेत सहभाग केला होता.
या बैठकीची फलश्रुती म्हणून केंद्रीय अर्थमंत्रालयाने सोमवारी परिपत्रक काढून, सराफांना सामना कराव्या लागणाऱ्या अडचणी लक्षात घेण्यासाठी अशोक लाहिरी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती स्थापित केली असल्याचे स्पष्ट केले आहे. या समितीवर अर्थमंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, कर अधिकाऱ्यांसह सुवर्ण उद्योगातील तीन प्रतिनिधींनाही सामावून घेतले जाईल आणि प्रत्येक घटकाला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
शिवाय दागिन्यांवरील नवीन अबकारी कर १ मार्च २०१६ पासून लागू झाला असला तरी, अबकारी विभागाकडे नोंदणीसाठी सराफांना ३० एप्रिल २०१६ पर्यंत मुदत दिली गेली आहे, असे कम्बोज यांनी स्पष्ट केले. करवसुली स्वयं-विवरण पद्धतीने होणार असून, सुवर्णकारांना अबकारी कर विभागातील निरीक्षकांचा कोणताही जाच होणार नाही याची हमी अबकारी विभागाने या आधीच दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
काही छोटय़ा संस्थांद्वारे फुटीच्या नाहक अफवा पिकविल्या जात असून, त्यावर विश्वास न ठेवता सुरळीत व्यवसाय सुरू करावा, असेही कम्बोज यांनी आवाहन केले.