देशभर थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा परिणाम म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर झाला असून जून २०२० मध्ये फंड गुंतवणुकीत घसरण झाल्याचे समोर आले आहे. वाढलेला टाळेबंदीचा कालावधी, नोकरी गमाविण्याची भीती आणि पगारात झालेल्या कपातीमुळे विविध म्युच्युअल फंड गटातील आवक कमालीची खालावली असल्याने वर्गवारीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

गुंतवणूकदारांनी १.६० लाख कोटी फंडातून काढल्याचे म्युच्युअल फंडाची शिखर संघटना असलेल्या ‘अ‍ॅम्फी’ने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत दिसून आले.

गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांनी सर्वाधिक पसंती समभाग गुंतवणुकीसाठी लार्ज कॅप आणि मल्टी कॅप गटांना दिली असून रोखे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदरांची पसंती लो डय़ूरेशन आणि कॉर्पोरेट बाँंड फंडांना लाभली आहे.

गुंतवणूकदारांनी मल्टी कॅप गटात सर्वाधिक १,८३५ कोटी रुपये तर लार्ज कॅप गटात १,५०९ कोटी रुपये गुंतविले. रोखे फंडात आवक आटली असून मे महिन्यातील ६३,६६५ कोटींच्या तुलनेत २,९६१ कोटींची रोखे फंडात आवक झाली.

मिडीयम टू लॉंग डय़ुरेशन फंड आणि क्रे डिट रिस्क फंडातून निधी काढून घेण्याचा कल जून महिन्यातदेखील सुरूच असल्याचे दिसले.

निर्देशांकात सुधारणा झाल्याचे प्रतिबिंब समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडात दिसून आले. समभाग फंडातील आवक मे महिन्यातील ५,२५६ कोटींच्या तुलनेत ४१ टक्कय़ांनी वाढून ७,६३३ कोटीं झाली आहे. मे महिन्यातील ८,१८३ कोटींच्या एसआयपी गुंतवणुकीच्या तुलनेत जून ८,१२२ कोटींची गुंतवणूक एसआयपीच्या माध्यमातून झाल्याचे दिसून आले आहे.

साधारणपणे जूनमध्ये लिक्विड फंडातून तिमाहीअखेर असल्याने गुंतवणुकीपेक्षा बँकेत खात्यात शिल्लक राखण्याला कंपन्या प्राथमिकता देत असल्याने सर्वाधिक निधी लिक्वीड फंडातून काढून घेण्यात आल्याचे अ‍ॅम्फीचे मुख्याधिखारी एन. एस. व्यंकटेश यांनी म्हटले आहे.

जून महिन्यात आमच्या मंचावर अ‍ॅम्फीपेक्षा वेगळा कल दिसून आला. आमच्या मंचावर एसआयपी गुंतवणुकीत वाढ झाली असून ज्यांनी मार्च महिन्यात एसआयपी बंद केली होती त्यांनी नव्याने एसआयपीला सुरुवात केल्याचे आणि आधीपेक्षा अधिक रक्कम एसआयपीच्या माध्यमातून गुंतवत असल्याचे दिसून आले आहे.

– हर्ष जैन. सहसंस्थापक, ‘ग्रो’