भांडवली वस्तूंच्या घसरणीमुळे दर ४.४ टक्क्यांवर उतरला

नवी दिल्ली : निश्चलनीकरणाच्या फेऱ्यातून गेल्या वर्षभरापासून देशातील उद्योगविश्व अद्याप सावरलेले नसताना गेल्या वित्त वर्षांच्या शेवटच्या महिन्यात औद्योगिक उत्पादनात प्रचंड मोठी घट नोंदली गेली आहे. भांडवली वस्तू, खनिजकर्म क्षेत्रातील घसरणीचा परिणाम म्हणजे मार्च २०१८ मध्ये एकूण औद्योगिक उत्पादन ४.४ टक्क्यांपर्यंत घसरले आहे.  हा दर गेल्या पाच महिन्यांच्या तळातील नोंदला गेला आहे. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत औद्योगिक उत्पादन ७.१ टक्के होते. यापूर्वीचा किमान औद्योगिक उत्पादन दर ऑक्टोबर २०१७ मध्ये १.८ टक्के होता. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी औद्योगिक उत्पादनाची स्थिती स्पष्ट केल्यानंतर आता गेल्या महिन्यांतील महागाई दराची प्रतीक्षा आहे.

औद्योगिक उत्पादनाची मोजपट्टी असलेला औद्योगिक उत्पादन निर्देशांक २०१७-१८ या एकूण आर्थिक वर्षांत ४.३ टक्के नोंदला गेला आहे. आधीच्या वर्षांतील ४.६ टक्क्यांच्या तुलनेतही तो यंदा घसरला आहे.

औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ७७ टक्के हिस्सा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्राची वाढ दोन महिन्यांपूर्वी ४.४ टक्के राहिली आहे. ती ३.३ टक्के या वार्षिक तुलनेत यंदा काही प्रमाणात उंचावली आहे. गेल्या संपूर्ण वित्त वर्षांत निर्मिती क्षेत्र नाममात्र वाढत ४.५ टक्क्यांवर राहिले आहे.

भांडवली वस्तू क्षेत्राची कामगिरी १.८ टक्के नोंदली गेली आहे. वर्षभरापूर्वी ती ९.४ टक्के होती, तर ग्राहकोपयोगी वस्तुनिर्मिती मात्र ०.६ टक्क्यांवरून २.९ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

खनिकर्म क्षेत्रातही घसरण

खनिकर्म क्षेत्र २.८ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. ते मार्च २०१७ मध्ये दुहेरी अंकात, १०.१ टक्के होते, तर गेल्या वित्त वर्षांच्या अखेरीस ऊर्जानिर्मिती वर्षभरापूर्वीच्या ६.२ टक्क्यांच्या तुलनेत यंदा कमी, ५.९ टक्के राहिली आहे.