गुंतवणूक मार्गदर्शन उपक्रम थेट सिडको भवनमध्ये

मुंबई : नव्या वित्त वर्षांचे स्वरूप कसे असेल याची स्पष्टता होण्यास काही दिवसांचा कालावधी असतानाच तत्पूर्वी आर्थिक नियोजनाकरिता गुंतवणुकीचा मार्गदर्शक ठरणारा उपक्रम खास सिडको कर्मचाऱ्यांकरिता ‘लोकसत्ता’च्या पुढाकाराने होत आहे.

म्युच्युअल फंडविषयक जनजागृती करणाऱ्या ‘म्युच्युअल फंड सही आहे’ प्रस्तुत आणि ‘सीडीएसएल’ ही डिपॉझिटरी सेवा सहप्रायोजक असलेला हा उपक्रम मंगळवार, २९ जानेवारी २०१९ रोजी दुपारी ३ वाजता सिडको सभागृह, सातवा मजला, सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे होत आहे.

हा विनामूल्य कार्यक्रम केवळ सिडको कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठीच असून यानिमित्ताने उपस्थित वक्त्यांना प्रश्न विचारून गुंतवणूकविषयक शंकांचे निरसन करण्याची संधी उपलब्ध आहे. यापूर्वी असे सत्र म्हाडा, बृहन्मुंबई महानगरपालिक तसेच मंत्रालय कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केले गेले आहे.

म्युच्युअल फंड उद्योगाची संघटना असलेल्या ‘अ‍ॅम्फी’चे पदाधिकारी आणि रिलायन्स म्युच्युअल फंडाचे विपणन प्रमुख संदीप वाळुंज व ‘सीडीएसएल’च्या आर्थिक साक्षरता विभाग प्रमुख अजित मंजुरे हे यानिमित्ताने मार्गदर्शन करतील.

सिडको एम्प्लॉइडज युनियनचे अध्यक्ष निलेश तांडेल, सरचिटणीस जे. टी. पाटील यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

‘म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे’ या विषयाद्वारे संदीप वाळुंज म्युच्युअल फंडविषयी प्रकाश टाकतील. फंडांचे प्रकार, त्यांची वैशिष्टय़े फंड आणि भांडवली बाजाराचा संबंध आदींबाबत ते मार्गदर्शन करतील.

‘सीडीएसएल’चे आíथक साक्षरता विभाग प्रमुख अजित मंजुरे ‘डीमॅटचे लाभ’ या विषयाद्वारे भांडवली बाजारातील व्यवहाराकरिता आवश्यक तांत्रिक व्यवस्थेबाबत भाष्य करतील. सुलभ व्यवहाराची उपयुक्तताही ते स्पष्ट करतील.