‘लोकसत्ता’कडून ‘बदलता महाराष्ट्र’च्या मंचावर सांगोपांग चर्चा

देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात सिंहाचा वाटा राखणाऱ्या आणि प्रचंड रोजगारक्षम लघुउद्योगाची क्षमता आणि या क्षेत्रापुढील आव्हानांवर सांगोपांग चर्चा ‘लोकसत्ता’च्या ‘बदलता महाराष्ट्र’ मंचावर घडणार आहे. लघुउद्योगाशी संबंधित सर्व पैलूंना स्पर्श करणाऱ्या दोन दिवसांच्या परिषदेत या क्षेत्रातील तज्ज्ञ, जाणकारांसह लघुउद्योजकांनाही सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

‘लोकसत्ता : बदलता महाराष्ट्र’चा यंदाचा परिसंवाद ‘लघुउद्योग : क्षमता आणि आव्हाने’ या विषयाला वाहिलेला आहे. ‘एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड’ आणि ‘एनकेजीएसबी बँक’ सहप्रायोजक असलेली ही परिषद ११ व १२ सप्टेंबर २०१७ रोजी मुंबईत होत आहे.

लघुउद्योगाला भेडसावणाऱ्या वित्तपुरवठय़ाच्या समस्येला परिषदेतील पहिल्याच दिवशी हात घातला जाणार आहे. तसेच लघुउद्योगासाठी वित्तीय सहकार्य उपलब्ध करून देणाऱ्या विविध स्रोताची चाचपणीही या वेळी होईल. ‘वित्तपुरवठा समस्या व स्रोत’ या विषयांतर्गत वित्त सेवा क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित लघुउद्योजकांना मार्गदर्शन करतील.

लघुउद्योगातील उत्पादनांना लोकप्रियता तसेच बाजारपेठ मिळविण्यात तारेवरची कसरत करावी लागते. तसेच बौद्धिक संपदेच्या  बाबतीतील नियम, कायद्यांनाही या क्षेत्राला सामोरे जावे लागते. लघुउद्योजकांच्या उत्पादनांना नाममुद्रा (ब्रँडिंग) मिळवून देण्याबाबतचे मार्गदर्शन ‘ब्रँडिंग, बौद्धिक संपदा, बाजारपेठ’ या चर्चासत्रांतर्गत केले जाईल.

लघुउद्योग क्षेत्रात असलेली कुशल रोजगाराची कमतरता तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव या महत्त्वाच्या बाबीवर परिषदेच्या निमित्ताने प्रकाश टाकला जाईल. ‘कुशल रोजगार व तंत्रज्ञान उपलब्धता’ या विषयावरील चर्चासत्रात कौशल्य विकास क्षेत्रातील जाणते आपले विचार मांडतील. सरकारच्या प्रोत्साहनानंतर उद्योग क्षेत्रात कौशल्य विकासावर कितपत व कसा भर दिला जात आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट होईल.

दुसऱ्या दिवशीचे पहिले सत्र ‘नियमावली : बंधन की व्यवसाय सुलभता’ या विषयाभोवती गुंफले जाईल. व्यवसायारंभापासून अनेक मंजुऱ्या-परवाने,इन्स्पेक्टर-राजच्या कचाटय़ात अडकलेल्या लघुउद्योजकांना हे सारे बंधन वाटते. व्यवसाय सुलभतेसाठी सरकार स्तरावर खरेच काही प्रयत्न होत आहेत काय, याचे उत्तर मिळविण्याचा प्रयत्न होईल. उद्योगाच्या लहान ते मोठे संक्रमणाबाबतचे अनुभव यशस्वी उद्योजक परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात कथन करतील.

लघुउद्योजकांना आवाहन

उद्योजकतेत अग्रेसर आणि अनुकूल अशा महाराष्ट्र राज्यात गावागावांत उद्यमशीलतेचा जोम आहे. साधन, साहाय्य, मार्गदर्शन यातून नेमकी दिशा शोधणारेही अनेक आहेत. उद्योजक म्हणून कारकीर्द सुरू केलेल्यांना उत्कर्षांच्या, चर्चा-संवाद-संपर्क यांच्या वाढीच्या दृष्टीने ‘लोकसत्ता- बदलता महाराष्ट्र’ हे आदर्श व्यासपीठ ठरेल. त्यांनाही या उपक्रमात सहभागी होण्याची संधी ‘लोकसत्ता’ने खुली केली आहे. इच्छुक लघुउद्योजकांनी सहभागासाठी arthmanas@expressindia.com  या ई-मेलवर संपर्क साधावा. त्यात आपले नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, तसेच आपल्या व्यवसाय-उपक्रमाचा तपशील, तसेच या परिसंवादातील सहभागामागील उद्दिष्ट थोडक्यात नमूद करावे.