वर्णद्वेषाविरुद्धच्या सामाजिक लढय़ासाठी कार्लसन-गिरी द्वयीची चाल

न्यूयॉर्क : पांढऱ्या मोहऱ्यानिशी डावाला सुरुवात करण्याची परंपरा चौसष्ट चौकटींच्या बुद्धिबळात अस्तित्वात आहे. परंतु मॅग्नस कार्लसन आणि अनिश गिरी या कट्टर प्रतिस्पध्र्यानी सामाजिक प्रश्नाखातर युतीची चाल रचून हा नियम मोडीत काढला. वर्णद्वेषाविरुद्धच्या अमेरिकेतील एका अभियानांतर्गत झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात काळ्या मोहऱ्यांनिशी सामन्याला प्रारंभ करण्यात आला.

नॉर्वेचा कालर्सन आणि नेदरलँड्सचा गिरी या दोन मातबर ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंनी आपल्या या ऐतिहासिक चालीची ध्वनिचित्रफीत आपल्या ‘ट्विटर’ आणि ‘फेसबुक’ खात्यांवर टाकली. मंगळवारी सायंकाळी जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेला कार्लसन आणि चौथ्या स्थानावर असलेला गिरी यांनी ओस्लो येथील ‘द गुड नाइट चेस पब’ येथील ही ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर टाकताच सर्वानी त्यांची प्रशंसा केली.

काळ्या मोहऱ्यांनी डावाचा प्रारंभ केलेल्या कार्लसनने म्हटले आहे की, ‘‘आज आम्ही बुद्धिबळातील नियम मोडीत काढला!’’ त्यानंतर गिरी म्हणाला, ‘‘मी वयाच्या सहाव्या वर्षांपासून बुद्धिबळ खेळत आहे. प्रत्येकदा पांढऱ्या मोहरीनेच डावाला प्रारंभ केला आहे. भविष्यातील मानसिकता बदलण्यासाठी हे पाऊल उचलले आहे!’’ मग कार्लसनने म्हटले आहे की, ‘‘हा नियम वर्ण किंवा राजकारणासाठी मुळीच नाही. बुद्धिबळात किंवा आयुष्यात रंगामुळे प्राधान्य मिळू नये, हाच संदेश देण्याचा आमचा उद्देश होता.

‘फिडे’च्या नियमानुसार बुद्धिबळाचा डाव हा नेहमीच पांढऱ्या मोहऱ्यांनिशी सुरू होतो. मात्र कार्लसन-गिरी द्वयींनी या मूलभूत नियमालाच आव्हान दिल्यामुळे बुद्धिबळ क्षेत्रात त्याची चर्चा होत आहे.