सर्व पिकांसाठी संपूर्णपणे सेंद्रिय (रसायनमुक्त) असलेल्या ‘अ‍ॅग्रो सेफ’ आणि ‘अ‍ॅग्रो मॅजिक’ या औषधांच्या वापरास शासनाने मान्यता दिली असल्याचा दावा भारत विकास समूहाच्या बीव्हीजी लाइफसायन्सेस लि. कंपनीने बुधवारी केला. बीव्हीजीने विकसित केलेली ही औषधी म्हणजे कृषीक्षेत्रातील अद्ययावत नॅनो तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच वापर आहे, असे या औषधांना सरकारच्या मान्यतेकडे पाहिले जात आहे. सेंद्रिय शेतीची गरज ओळखून बीव्हीजीने हाती घेतलेल्या मोहिमेचा भाग म्हणून अ‍ॅग्रो सेफ आणि अ‍ॅग्रो मॅजिक ही पीक संरक्षक व संवर्धक औषधे पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे भारत विकास समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी माहिती दिली. सध्या महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांत शेतीसाठी रासायनिक औषधांचा वापर मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या रोगांना आपण आमंत्रण देत आहोत. पंजाबमध्ये एकूण लोकसंख्येच्या तुलनेने कर्करोगांचे प्रमाण सर्वाधिक आहे. केवळ अमर्यादित रासायनिक खते आणि औषधांचा वापर करण्यात आल्याने ही वेळ आली आहे. हे संकट टाळता येऊ शकते, असाच आपला प्रयत्न असल्याचे गायकवाड म्हणाले.