फेब्रुवारीत उत्पादन, विक्री, रोजगारात वाढ

नवी दिल्ली : देशातील निर्मिती क्षेत्राची वाढ गेल्या महिन्यात १४ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. या क्षेत्राचा निर्देशांक फेब्रुवारीमध्ये ५४.३ अंश राहिला आहे. निक्केई इंडिया निर्मिती खरेदी व्यवस्थापकांचा निर्देशांक ५० अंश असा समाधानकारक मानला जातो. जानेवारी २०१९ मध्येही तो यापेक्षा वर, ५३.९ टक्के होता.

उत्पादन, विक्री तसेच रोजगारात वाढ झाल्याने यंदा निर्मिती क्षेत्राचा प्रवास उंचावल्याचे हा निर्देशांक तयार करणाऱ्या आयएचएस मार्किटने अहवालात म्हटले आहे.

यंदा हा निर्देशांक गेल्या १४ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर आहे. तसेच तो सलग १९ व्या महिन्यात ५० अंशांवर राहिला आहे. डिसेंबर २०१७ नंतर व्यवसायस्थिती सुधारल्याचे मानले जाते.

चालू आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीकडे अर्थव्यवस्थेचा प्रवास सुरू असताना अंतिम टप्प्यात भारताच्या निर्मिती क्षेत्रातील सुधार कायम असल्याचे आयएचएस मार्किटचे प्रधान अर्थतज्ज्ञ पॉलिआना डी लिमा यांनी म्हटले आहे. उत्पादन निर्मितीने देशांतर्गत तसेच विदेशातील वस्तूची मागणी पूर्ण करता आली आहे, असेही ते म्हणाले. यंदा रोजगारातही वाढ झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

निर्मिती क्षेत्राच्या उल्लेखनीय कामगिरीला सावरत्या महागाईची जोड मिळाल्याने आता व्याजदर कपातीची शक्यता अधिक केली जात आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण २ ते ४ एप्रिलदरम्यान जाहीर होईल. आयएचएस मार्किटने २०१८-१९ या चालू वित्त वर्षांकरिता सकल राष्ट्रीय उत्पादन ७.१ टक्के असेल, असाही अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी तो ७ टक्के अंदाजित केला होता.