सुधीर जोशी

चीनच्या औद्योगिक उत्पादनाच्या आशादायक आकडय़ांमुळे आशियातील बाजारांबरोबर भारतीय बाजारही दीड टक्क्य़ांच्या वाढीने उघडून सप्ताहाची सुरुवात उत्साही झाली. खंगलेल्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी अर्थप्रोत्साहक घोषणा सरकार करेल अशा बातमीचाही हा परिणाम होता. भारताच्या दुसऱ्या तिमाहीतील औद्योगिक वाढीचे उत्साहजनक आकडे, दुचाकी व प्रवासी वाहन विक्रीतील वाढ व टाळेबंदी शिथिल करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे उपाहारगृहे, चित्रपटगृहे, पर्यटनस्थळे सुरू होऊन अर्थचक्राला चालना आणि रोजगारातही भर पडण्याच्या संकेतांवर बाजाराने शेवटच्या दिवशी पुन्हा उसळी घेतली. साप्ताहिक तुलनेत प्रमुख निर्देशांकात साडेतीन टक्क्यांची वाढ झाली.

इन्फोसिस व एचसीएल टेक्नॉलॉजीजचा अग्रिम कराचा दुसऱ्या हप्त्याचा भरणा अनुक्रमे सोळा व आठ टक्के जास्त आहे. दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला पात्र असणाऱ्या या कंपन्या अल्प मुदतीतही लाभ देऊन जातील. टाळेबंदीच्या काळात ज्या कंपन्यांची वितरण व्यवस्था मजबूत आहे त्यांना त्यांच्या स्पर्धकांवर कुरघोडी करता आली. ब्रिटानिया व कोलगेट या बहुराष्ट्रीय कंपन्या यामध्ये अग्रेसर दिसतात. अशीच विस्तीर्ण वितरण व्यवस्था असलेली कंपनी म्हणजे बजाज इलेक्ट्रिकल्स. घरातून काम करण्याच्या नवीन पायंडय़ामुळे घरच्या घरी पदार्थ तयार करण्याची लागलेली सवय आणि सणासुदीचा काळ पाहता स्वयंपाकघरातील लहान उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांना चांगले दिवस आले आहेत. उत्पादनांची विविधता व ग्राहकांमध्ये नाव असणाऱ्या या कंपनीत मध्यम कालावधीसाठी सध्याच्या बाजारभावात गुंतवणुकीची संधी वाटते.

हुतामाकी पीपीएल (आधीची पेपर प्रॉडक्ट्स) ही ८० वर्षे जुनी कंपनी लवचीक वेष्टनाच्या क्षेत्रातील फिनलंडमधील कंपनीची भारतातील उपकंपनी आहे. भारतात अठरा ठिकाणांहून उत्पादन घेणाऱ्या या कंपनीला सध्याच्या तयार खाद्यपदार्थातील वाढणाऱ्या विक्रीचा लाभ घेता येईल. सर्वच क्षेत्रांतील लहान उद्योगांप्रमाणे या क्षेत्रातील लहान उद्योग डबघाईस आले आहेत. त्यामुळे स्पर्धा कमी झाली आहे. सध्याच्या बाजारमूल्यास वर्षभरासाठी या कंपनीतील गुंतवणूक आकर्षक वाटते.

या आठवडय़ात रद्द झालेली रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीची बैठक पुढच्या आठवडय़ात होईल. ज्यामध्ये व्याजदरांचा आढावा घेतला जाईल. टाळेबंदी काळातील कर्जाच्या हप्त्यांसोबत व्याज माफीचा निर्णयही पुढील आठवडय़ात होईल. धोरणांची अनिश्चितता संपली की बँकांचे समभाग वर जाऊ लागतील ज्याची सुरुवात या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी दिसली. नवीन नोंदणी झालेल्या कॅम्स व केमकॉन स्पेशालिटीसारख्या समभागांचे बाजाराने केलेले स्वागत, सप्टेंबर महिन्यातील वस्तू व सेवा करांची वसुली, मुंबईमधील स्थावर मालमत्तेचे व्यवहार पूर्वपदावर येण्याची आकडेवारी तसेच परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या ओघाचे आकडे पुढील महिन्यासाठी बाजाराला शुभसंकेत देत आहे. अर्थात, करोनाबाधितांच्या वाढीसंबंधीच्या बातम्या बाजारावर तात्कालिक परिणाम करू शकतात.

sudhirjoshi23@gmail.com