गुजरातमधील प्रस्तावित नवा कारनिर्मिती प्रकल्प स्वतंत्ररीत्या उभे करू पाहणाऱ्या जपानच्या सुझुकी मोटर्सच्या विरोधातील धार अधिक तीव्र होऊ लागली आहे. देशातील भागीदार मारुतीला बाजूला सारून या प्रकल्पाची १०० टक्के मालकी घेऊ पाहणाऱ्या सुझुकीला विरोध करणाऱ्यांमध्ये आता नऊ संस्थांगत गुंतवणूकदारांची भर पडली आहे.
मारुती सुझुकीचा गुजरातमध्ये २०१७ मध्ये येऊ पाहणाऱ्या नव्या वाहननिर्मिती प्रकल्पात १०० टक्के स्वत:ची मालकी ठेवण्याचा प्रस्ताव सुझुकीने जानेवारीत पारित केला. या प्रकल्पातील प्रवासी वाहने मारुती खरेदी करून ती सुझुकीला विकून देईल, अशीही रचना मुख्य प्रवर्तक सुझुकी कंपनीने केली आहे. या योजनेला सर्वप्रथम मारुती सुझुकीतील सात म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी विरोध दर्शविला. याबाबत त्यांनी कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांना थेट पत्रही लिहिले. आयुर्विमा महामंडळासह आता या प्रस्तावाबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्यांमध्ये खासगी विमा कंपन्याही सहभागी झाल्या आहेत.
महामंडळाला सुझुकीकडून प्रतिसाद न मिळाल्याने ‘व्यथित अंत:करणाने पुन्हा पत्र लिहीत’ असल्याचे दुसऱ्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्याला एचडीएफसी स्टॅण्डर्ड लाइफ इन्शुरन्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, रिलायन्स लाइफ इन्शुरन्स, बिर्ला सनलाइफ इन्शुरन्स या खासगी विमा कंपन्यांनीही साथ दिली आहे.
मारुतीला उद्यम व्यावसायिक धोरणांची आठवण करून देणारा सूर या पत्रात आहे. तसेच मारुतीच्या स्वत:च्या मालकीचा म्हणून हा प्रकल्प उभारण्याचे कर्तव्य पार पाडण्याचे आवाहनही या पत्रात करण्यात आले आहे. कंपनी संचालक मंडळाच्या पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मांडून तो मंजूर करण्याविषयीही या गुंतवणूकदारांनी नव्या पत्रात सुचविले आहे. याच पत्रात मारुतीने सुझुकीला देय असलेल्या स्वामित्व शुल्काबाबत प्रश्न उपस्थित करून स्वामित्व शुल्करचना स्पष्ट करण्याविषयीही सांगण्यात आले आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे भांडवली बाजारात बुधवारी मारुती सुझुकीचा समभाग ४.३% आपटला, पण दिवसअखेर मात्र तो सावरला.