कर्ज थकण्याचे  प्रमाणही ३८ टक्क्य़ांवर

मुंबई : देशातील सूक्ष्म वित्त उद्योगामार्फत वितरित कर्जात गेल्या आर्थिक वर्षांत ४० टक्के वाढ झाली आहे.बचत गटांच्या माध्यमातून तळच्या लोकांपर्यंत  पोहोचणाऱ््या या सूक्ष्म वित्त संस्थांमार्फत वितरित कर्जाची रक्कम मार्च २०१९ अखेर १,७८,५८७ कोटी रुपये झाली आहे.

सरलेल्या २०१८-१९ या आर्थिक वर्षांत सूक्ष्म वित्त संस्थांकडील एकूण कर्ज खात्यांमध्ये तब्बल ८३ टक्के हिस्सा हा देशातील आघाडीच्या १० राज्यांचा राहिला आहे.

‘सिडबी’ आणि ‘इक्विफॅक्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या एका अहवालानुसार, वर्षभरापूर्वी, २०१७-१८ मध्ये एकूण सूक्ष्म वित्त कर्ज वितरणाची रक्कम १,४८,४४० कोटी रुपये होती.

गेल्या आर्थिक वर्षांत सर्वाधिक वितरीत सूक्ष्म वित्त कर्जे तामिळनाडूमधील आहेत. देशाच्या तुलनेत  १० राज्यांमध्ये अव्वल असे हे प्रमाण ३४.७ टक्के आहे. तर बिहार कर्नाटक राज्यातील सूक्ष्म वित्त कर्ज वितरण प्रमाण ५४ टक्क्यांहून अधिक तसेच १५,००० कोटी रुपयांहून जास्त असल्याचे या अहवालाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या आर्थिक वर्षांत नवीन सूक्ष्म वित्त कर्जाचे प्रमाण ३६ टक्क्यांनी वाढले असून त्याची रक्कम २,१३,०७४ कोटी रुपये असल्याची माहिती सिडबीचे अध्यक्ष मोहम्मद मुस्तफा यांनी दिली. तर संख्येबाबत कर्ज वितरणाच्या वृद्धीचे प्रमाण २० टक्के असल्याचेही त्यांनी सांगितले.

सूक्ष्म वित्त कर्ज वितरणात सूक्ष्म वित्त कंपन्या तसेच गैर बँकिंग वित्त कंपन्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांचे एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत थकीत कर्ज ३८ टक्के म्हणजेच ६८,१५६ कोटी रुपये आहे.