वार्षिक एक कोटी रुपये आणि अधिक करपात्र उत्पन्न असणाऱ्या देशातील व्यक्तिगत प्राप्तिकर दात्यांच्या संख्या गेल्या वित्त वर्षांत तब्बल २० टक्क्यांनी वाढली आहे. सरलेल्या वर्षांत अशा ९७,६८९ करदात्यांनी विवरणपत्र भरले आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने शुक्रवारी जाहीर केलेल्या श्रीमंत करदात्यामध्ये व्यक्तिगत करदाते, हिंदू अविभक्त कुटुंबीय, कंपन्या, आस्थापना अशा एकूण १.६७ लाख जणांचे प्राप्तिकर उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट केले. अशा श्रीमंतांची संख्या आधीच्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत १९ टक्क्यांनी वाढली आहे.

व्यक्तिगत करदात्यांमध्ये, आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये वार्षिक एक कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यक्तिगत करपात्र उत्पन्न असलेल्यांची संख्या ९७,६८९ नोंदली गेली आहे. आधीच्या आर्थिक वर्षांत ती ८१,३४४ इतकी होती.

गेल्या वित्त वर्षांत ५.८७ कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यात आली आहेत. २०१८-१९ कर निर्धारण वर्षांसाठी प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०१९ होती.

कर प्रशासनाकडे १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत दाखल झालेल्या एकूण प्राप्तिकर विवरणपत्रांमध्ये ५.५२ कोटी व्यक्तिगत करदात्यांची, ११.३ लाख हिंदू अविभक्त कुटुंबांची, १२.६९ लाख भागीदारी आस्थापना आणि ८.४१ लाख कंपन्यांचा समावेश आहे.