नव्या अनुत्पादित मालमत्तेत वाढ होण्याचे प्रमाण आगामी कालावधीत घटणार असले तरी देशातील बँकांच्या वाढत्या बुडीत कर्जाचा भार चालू आर्थिक वर्षभर कायम असेल, असे ‘मूडीज’ने सूचित केले आहे.
आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने जारी केलेल्या गुंतवणूक सेवा अहवालात ही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षांत नव्या अनुत्पादित मालमत्तेच्या प्रमाणात घसरण दिसली तरी बँकांना वाढत्या बुडीत कर्जाचा सामना करावाच लागेल, असे या अहवालाने सर्वेक्षणाच्या आधारे निष्कर्ष मांडला आहे.
भांडवल उभारणीबाबत, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सुधारण्यास फारसा वाव नसल्याचे स्पष्ट करत येत्या दोन वर्षांसाठी ही समस्या कायम असेल, असेही ‘मूडीज’ने म्हटले आहे. सरकारकडून या बँकांना भांडवली सहाय्यासाठी हात आखडता घेण्याचे धोरण कायम असेल; तसेच सार्वजनिक बँकांच्या भांडवल उभारणीची पातळी फार काही उंचावणार नाही, असे सर्वेक्षणात बहुतांशांनी कौल दिला आहे.

देना बँक अनुत्पादित मालमत्ता विकणार
अनुत्पादक मालमत्ता ‘एआरसी’ला विकण्याचा प्रथमच प्रयत्न करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील देना बँकेने कमी रकमेच्या कर्ज खात्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. बँक चालू आर्थिक वर्षांत प्रत्येकी २ लाख रुपये व त्यापुढील ‘एनपीए’ बनलेल्या कर्ज खात्यांची महिन्याभरात विक्री करेल, असे बँकेचे कार्यकारी संचालक आर. के. ठक्कर यांनी सांगितले. कर्जाची विक्री होणारी खाती ही किरकोळ तसेच व्यापारी कर्ज प्रकारातील आहेत. बँकेने पहिल्या तिमाहीत या माध्यमातून केवळ ३० कोटी रुपयेच वसुल करता आले.

बँक ऑफ इंडियाची बुडीत कर्ज रक्कम दुप्पट
सार्वजनिक क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाच्या बँक ऑफ इंडियाच्या बुडीत कर्जाची (एनपीए) रक्कम चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत दुप्पट झाली आहे. बँकेच्या एकूण एनपीएचे प्रमाणही त्याच वेगाने वाढले आहे. जून २०१५ अखेर ते वर्षभरापूर्वीच्या ३.२८ टक्क्य़ांवरून ६.८० टक्के झाले आहे. तर बुडीत रक्कम या कालावधीत ८९३ कोटी रुपयांवरून थेट १,५१५ कोटी रुपये झाली आहे. या साऱ्यांचा विपरीत परिणाम बँकेचा तिमाही नफा ८४ टक्क्य़ांनी घसरण्यावर झाला आहे. बँकेने यंदा १२९.७२ कोटी रुपये नफा नोंदविला आहे.

यूनियन बँकेची ‘एनपीए’ तरतूद वाढली
बुडीत कर्जासाठी (एनपीए) करण्यात आलेली तरतूद वाढल्याने यूनियन बँकेच्या नफ्यात पहिल्या तिमाहीत २२ टक्के घसरण झाली आहे. बँकेला एप्रिल ते जून २०१५ दरम्यान ५१८.७८ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. बुडीत कर्जापोटी करावी लागणारी बँकेची तरतूद वर्षभरापूर्वीच्या ३९३ कोटी रुपयांवरून वाढून ६४२ कोटी रुपये झाली आहे.

सिंडिकेट बँकेच्या ‘एनपीए’मध्ये वाढ
सिंडिकेट बँकेच्या अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत वाढून ३.७२ टक्के झाले आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत हे प्रमाण २.९७ टक्के होते. बँकेने एकूण उत्पन्नात वाढ नोंदविली असली तरी यंदाच्या तिमाहीत नफ्यात ३८ टक्के घसरण राखली आहे. बँकेला तिमाहीत ३०१.९८ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

पंजाब नॅशनल बँकेचे ४०० कर्जदार ‘निर्ढावलेले’
सार्वजनिक क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ४०० कर्जदारांना ‘निर्ढावलेले’ अर्थात विलफुल डिफॉल्टर घोषित केले असून, त्याबाबतची माहिती रिझव्‍‌र्ह बँकेला दिली आहे. बँक तिच्याकडील ४,००० कोटी रुपयांची अनुत्पादक मालमत्ता चालू वित्तवर्षअखेपर्यंत विकण्याच्या तयारीत आहे. बँकेने निश्चित केलेल्या निर्ढावलेल्या कर्जदारांची यादी तयार केली असून रिझव्‍‌र्ह बँक ती संकेतस्थळावर टाकेल, अशी माहिती पंजाब नॅशनल बँकेचे कार्यकारी संचालक गौरी शंकर यांनी दिली. कर्ज पुनर्बाधणी अंतर्गत बँकेने चार-पाच कंपन्यांची खाती निश्चित केली असून, याबाबतची प्रक्रिया रिझव्‍‌र्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वाखाली अवलंबिली जाईल. ही खाती प्रामुख्याने ऊर्जा व स्टील क्षेत्रातील कंपन्यांची आहेत.