गुंतवणूकदारांचे चार दिवसात १९.४९ लाख कोटींचे नुकसान; व्यवहारा दरम्यान २८ हजाराचा स्तरही सोडला

मुंबई : करोना विषाणूच्या प्रसारधास्तीने गेल्या काही दिवसांपासून मोठी निर्देशांक आपटी नोंदविणारे सेन्सेक्स व निफ्टी चौथ्या व्यवहारातही नकारात्मक प्रवास नोंदविणारे ठरले.एकटय़ा मुंबई शेअर बाजारात यामुळे गेल्या चार व्यवहारात मिळून ५,८१५.२५ अंश आपटी नोंदविली गेली. परिणामी बाजारातील गुंतवणूकदारांचे १९.४९ लाख कोटी रुपये लयाला गेले.गेल्या तीन सत्रातील घसरणीवर पाऊल ठेवताना सेन्सेक्समधील गुरुवारच्या सुरुवातीच्या सत्रातील आपटी कायम होती. सुरुवातीलाच २,१५५ अंश घसरण नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाने त्याचा २८ हजाराचा स्तरही या दरम्यान सोडला.

गुरुवारअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारच्या तुलनेत ५८१.२८ अंश घसरणीने २८,२८८.२३ वर स्थिरावला. तर २०५.३५ अंश घसरणीने निफ्टी ८,२६३.४५ पर्यंत खाली आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी व्यवहारात ७,९०० च्याही खाली आला होता.

दोन्ही निर्देशांकात सत्रअखेर जवळपास अडिच टक्क्य़ांची घसरण नोंदली गेली.मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल गुरुवारअखेर १०९.७६ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले.चार व्यवहारात ते १९.४९ लाख कोटी रुपयांनी कमी झाले. १,२०० हून अधिक कंपन्यांचे समभाग मूल्य त्यांच्या वर्षभराच्या तळाला पोहोचले. सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्स सर्वाधिक १०.२४ टक्क्य़ांसह घसरला. तर मारुती सुझुकी, अ‍ॅक्सिस बँक, महिंद्र अँड महिंद्र, टेक महिंद्र, ओएनजीसीही खाली आले. आयटीसी, भारती एअरटेल, कोटक महिंद्र बँक, हीरो मोटोकॉर्प आदी मात्र ७.५० टक्क्य़ांपर्यंत वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, भांडवली वस्तू, वाहन, ऊर्जा, उद्योग निर्देशांक ७.१७ टक्क्य़ांपर्यंत घसरले. तर केवळ दूरसंचार निर्देशांक वाढ नोंदविणारा ठरला. मिड कॅप व स्मॉल कॅप ४.५३ टक्क्य़ांपर्यंत घसरले.

रुपया ७५ च्या खाली

भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांबरोबर स्थानिक चलनातील घसरणीने गुरुवारी आणखी वेग घेतला. परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपया एकाच व्यवहारात थेट ८४ पैशांनी घसरून ७५ च्याही खाली, ७५.१० पर्यंत पोहोचला. सत्रात रुपयाचा स्तर ७५.३० पर्यंत तळात पोहोचला होता. व्यवहारात ७४.७० पर्यंतच तो मजल मारू शकला. बुधवारअखेर ७४.२६ वर स्थिरावलेला रुपया गुरुवारच्या सकाळच्या सत्रातच ७५च्या वेशीवर येऊन पोहोचला होता.

खनिज तेल किंमतीत उभारी

सकाळच्या व्यवहारात गेल्या दिड वर्षांच्या तळात पोहोचलेल्या खनिज तेलाच्या दर अखेर काही प्रमाणात सावरले. प्रमुख लंडनच्या बाजारातील काळ्या सोन्याचे दर २००३ नंतरच्या तळात पोहोचल्यानंतर दिवसअखेर जवळपास ८ टक्क्य़ांनी उंचावले. ब्रेंट क्रूड प्रति पिंप २६.१५ डॉलपर्यंत सावरू शकले.