‘शाईनडॉटकॉम’ सर्वेक्षणातील कर्मचारी कल

आर्थिक राजधानी मुंबईतील कर्मचाऱ्यांना यंदा २० टक्क्य़ांपेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा आहे. तर तुलनेत दिल्ली आणि बंगळूर येथील कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारात १० टक्केपर्यंत वाढ होईल, असे वाटते.

‘शाईनडॉटकॉम’ या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या रोजगाराशी निगडित संकेतस्थळाने अलीकडेच केलेल्या पहिल्या उमेदवारकेंद्री आढावा सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट केली आहे.

मनुष्यबळ विभाग किंवा कंपनीच्या दृष्टीकोनाऐवजी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांवर केंद्रित हे सर्वेक्षण माहिती तंत्रज्ञान, बँका आणि वित्त, औद्योगिक उत्पादने, शिक्षण/प्रशिक्षण, ग्राहकपयोगी वस्तू उत्पादन सारख्या विविध उद्योगातील व्यावसायिकांमध्ये करण्यात आले.

मुंबई, पुणे आणि चेन्नईसारख्या शहरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना २०% पेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा असल्याचे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले. मुंबईतील ३७% लोकांना २०% पेक्षा जास्त वेतनवाढीची अपेक्षा आह. तर पुणे आणि चेन्नई येथील आकडेवारी अनुक्रमे ३६% आणि ३८% आहे. भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणजे बंगळूर येथे २१% लोकांना त्यांच्या पगारात १०% पर्यंत वाढ होईल, असे वाटते. तर देशाची राजधानी दिल्ली व परिसरात २०% लोकांना कमी पगारवाढ होईल, असे वाटत असल्याचे हे सर्वेक्षण सांगते.

‘शाईनडॉटकॉम’च्या सर्वेक्षणात निदर्शनास आलेली आणखी एक बाब म्हणजे,  मुंबईतील शिक्षण/ प्रशिक्षण क्षेत्रातील ६२% कर्मचारी २०%पेक्षा अधिक वेतनवाढीची अपेक्षा करत आहेत तर वाहन क्षेत्रातील ५६% कर्मचाऱ्यांनादेखील तेवढय़ाच प्रमाणातील वाढीची अपेक्षा आहे. पुण्यातील वाहन क्षेत्रातील ४८% आणि शिक्षण/प्रशिक्षण क्षेत्रातील ३८% कर्मचाऱ्यांना २०% पेक्षा अधिक वेतनवाढीची अपेक्षा आहे. या दोन्ही शहरांमध्ये बहुतांशी क्षेत्रात मोठी वाढ होत आहे आणि एकत्रितरित्या त्यांचा वार्षिक वेतन आढावा कल देशात सर्वाधिक आहे.

सर्वेक्षणाबद्दल ‘शाईनडॉटकॉम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी झाइरस मास्टर म्हणाले की, विविध शहरे आणि उद्योग, सेवाक्षेत्र यातील कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांमध्ये अंतर आहे. बहुतांशी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा उच्च असल्या तरी सर्वच संस्था त्या पूर्ण करू शकणार नाहीत. नेहमीप्रमाणे आम्ही कर्मचाऱ्यांचे कौशल्य आणि अपेक्षा यानुरूप त्यांना नोकरी सुचवण्यासाठी सर्व प्रयत्न करत राहू तसेच आमच्या ‘शाईन लर्निंग’ मंचाद्वारे त्यांना कौशल्य वाढवण्यासाठी सक्षमेची संधीही देऊ, असेही ते म्हणाले.

वेतनवाढीच्या अपेक्षांच्या क्षेत्रवार विश्लेषणातून बँका व वित्त आणि माहिती तंत्रज्ञाानाशी निगडित क्षेत्रातील व्यावसायिकांमधील कल उच्च असल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट होते. या क्षेत्रातील ३५% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना २०% पेक्षा अधिक वेतनवाढीची अपेक्षा आहे. तंत्रज्ञानामधील प्रगती आणि अद्ययावतेच्या जोरावर वृद्धिंगत होत असलेल्या या क्षेत्रांमध्ये इतक्या उच्च अपेक्षा असणे यात आश्चर्यकारक असे काहीच नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्वेक्षणात सहभागी झालेले प्रतिसादकर्ते प्रामुख्याने मुंबई (१९.४९%), दिल्ली (२०.८९%), बंगळूर (२०.८९%), हैदराबाद (१६.४३%), पुणे (९.३४%) आणि चेन्नई (११.६४%) सारख्या महानगरांमधील होते.

भविष्यात दीर्घकाळ श्रेष्ठ प्रतिभा सांभाळण्यासाठी संस्थांना आपल्याकडील मानव संसाधनावर अधिक गुंतवणूक करावी लागणार आहे, हेच याबाबतच्या सर्वेक्षणातून स्पष्ट होते, असे ‘शाईनडॉटकॉम’ने म्हटले आहे.