म्युच्युअल फंड उद्योगाने सरलेल्या २०१९ सालात ६८ लाख नवीन गुंतवणूक खाती (फोलियोंची) भर घातली असून, त्यायोगे एकूण गुंतवणूक खाती ८.७ कोटींवर गेली आहेत. तथापि मागील तीन वर्षांच्या तुलनेत वाढीचा दर मात्र काहीसा घसरला आहे.
म्युच्युअल फंडात होणाऱ्या प्रत्येक गुंतवणुकीला विशिष्ट फोलियो क्रमांक दिला जातो. मात्र एका गुंतवणूकदाराच्या एकापेक्षा अधिक फंडांमध्ये गुंतवणूक शक्य असल्याने, फोलियोंची संख्या ही एकूण गुंतवणूकदारांची संख्या दर्शवीत नाही.

बाजार नियंत्रक ‘सेबी’कडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०१९ अखेर फोलियोंची संख्या आठ कोटी ७१ लाख अशी झाली आहे, जी डिसेंबर २०१८ अखेर आठ कोटी तीन लाख अशी होती. म्हणजे वर्षभरात ६८ लाख नवीन फोलियोंची भर पडली आहे. २०१८ सालात नवीन फोलियोंचे वाढीचे प्रमाण १.३८ कोटी, २०१७ मध्ये १.३६ कोटी, २०१६ सालात ७० लाख तर २०१५ सालात ५६ लाख असे होते.

रोखेसंलग्न फंडांतील फोलियोंची संख्याही वर्षांगणिक ७१ लाखांवरून ४३ लाख अशी घसरली आहे. या फंडांतील एकूण फोलियोंची संख्या त्यामुळे १.१३ कोटी झाली आहे. आयएल अँड एफएस प्रकरणानंतर, रोखेसंलग्न फंडांची वाढलेली जोखीम पाहून गुंतवणूकदारांनी त्याकडे पाठ करण्याचा सजगपणे निर्णय घेतल्याचे विश्लेषक सांगतात.

समभागसंलग्न फंडांमधील नवीन फोलियोंची संख्या २०१९ मध्ये १२.७५ लाखांनी वाढून ६.२५ कोटींवर गेली आहे. जी २०१८ सालात भर पडलेल्या १.२ कोटींच्या तुलनेत खूपच कमी आहे.