12 November 2019

News Flash

म्युच्युअल फंड उद्योगाला पुन्हा गुंतवणूक बहर

मे महिन्यात गंगाजळी २५.४३ लाख कोटींवर

(संग्रहित छायाचित्र)

केंद्रात पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी सशक्त संख्याबळासह आल्याने बळावलेल्या बाजार भावना म्युच्युअल फंड उद्योगाच्या पथ्यावर पडल्या आहेत.  या उद्योगाची एकूण गंगाजळी ही सरलेल्या मे महिनाअखेर काहीशी वाढून २५.४३ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. विशेषत: अधिक जोखीम असलेल्या समभागसंलग्न (इक्विटी) फंडांमधील वाढलेले योगदान याला कारणीभूत ठरले आहे.

म्युच्युअल फंड उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘अ‍ॅम्फी’कडून प्रसिद्ध आकडेवारीनुसार, एप्रिल २०१९ अखेर देशातील सर्व म्युच्युअल फंडांकडील गुंतवणूकयोग्य गंगाजळी (एयूएम) २५.२७ लाख कोटी रुपये होती, ती मे महिनाअखेर २५.४३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. समभागसंलग्न योजनांमधील या महिन्यांतील नक्त गुंतवणूक ओघ हा ५,४१० कोटी रुपयांचा राहिला.

उल्लेखनीय म्हणजे यातील जवळपास निम्मा वाटा म्हणजे २,७०० कोटी रुपयांचा ओघ हा मिड आणि स्मॉल कॅप फंडांमध्ये राहिला.  हा ओघ सप्टेंबर २०१६ म्हणजे ३१ महिन्यांपूर्वीच्या गुंतवणूक ओघाशी बरोबरी साधणारा असला तरी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घसरणीला यातून खंड मात्र पाडला गेला आहे.

‘अ‍ॅम्फी’कडून उपलब्ध आकडेवारीनुसार, मनी मार्केट/लिक्विड फंडांनी मे महिन्यात ७२,५०० कोटी रुपये आकर्षित केले. एप्रिल महिन्यासाठी हे प्रमाण ९६,२०० कोटी रुपयांचे होते. ओव्हरनाइट फंडांमध्ये २,३५० कोटी रुपयांचा ओघ मे महिन्यात दिसून आला. समभाग त्याचप्रमाणे कर्जरोख्यांमध्ये संतुलित गुंतवणूक असणाऱ्या हायब्रीड फंडांमध्ये मे महिन्यात १,२७० कोटी रुपयांची गुंतवणूक आली तर १,६१० कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढून घेतली.

निवडणुकांपश्चात अनिश्चिततेचा पैलू संपुष्टात आला असून, आता राजकीय स्थिरता, चलनफुगवटय़ाचा अत्यल्प दर, व्याजदरात कपातीसारख्या सकारात्मक घटकांच्या परिणामाने गुंतवणूक ओघ पुन्हा बहरताना दिसत आहे. तथापि मासिक ‘एसआयपी’ गुंतवणुकीने निरंतर ८,००० कोटी रुपयांची मात्रा याकाळातही कायम राखली आहे.  आर्थिक सुधारणांची निरंतरता आणि अर्थव्यवस्थेत सुधारासह कंपन्यांच्या मिळकतीतही वाढीची जोड मिळाल्यास गुंतवणूक ओघ यापुढे वाढतच जाण्याची आशा आहे.

एन. एस. व्यंकटेश, मुख्याधिकारी, अ‍ॅम्फी

First Published on June 11, 2019 1:40 am

Web Title: mutual fund industry reinvested again