एचडीएफसीचे दीपक पारेख यांचा आशावाद

आगामी पाच वर्षांत म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्ता ५० लाख कोटींचा टप्पा ओलांडेल, असा आशावाद ‘एचडीएफसी’चे अध्यक्ष दीपक पारेख यांनी व्यक्त केला. वाढत्या रोजगाराच्या संधी व  गुंतवणूकदारांच्या बदलत्या मानसिकतेमुळे म्युच्युअल फंडांकडे वाढलेल्या कलातून ही किमया घडेल, असे ते म्हणाले.

म्युच्युअल फंड उद्योगाची संघटना ‘अ‍ॅम्फी’द्वारे गुरुवारी येथे आयोजित म्युच्युअल फंड शिखर परिषदेला संबोधित करताना अर्थव्यवस्थेतील मध्यमवर्गाची वाढती क्रयशक्ती आणि म्युच्युअल फंडांबाबत वाढलेली जागरूकता यामुळे म्युच्युअल फंड व्यवसाय नव्या यशाची शिखर पादाक्रांत करेल असे पारेख म्हणाले. सध्या म्युच्युअल फंडाची मालमत्ता २४ लाख कोटींची आहे. पुढील पाच वर्षांत आजच्या तुलनेत त्यात दुपटीहून अधिक वाढ शक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी ‘सेबी’ अध्यक्ष अजय त्यागी, ‘अ‍ॅम्फी’चे अध्यक्ष आणि आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी ए. बालासुब्रमणियन, तर अ‍ॅम्फीचे उपाध्यक्ष आणि एल अँड टी म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश कुलकर्णी उपस्थित होते.

भारतात म्युच्युअल फंडातील गुंतवणूक देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत केवळ ११ टक्के असल्याची खंत व्यक्त करतानाच, या संबंधाने जागतिक सरासरी ६२ टक्के असल्याचे पारेख यांनी सांगितले. त्यामुळे या बाजारपेठेला वाढीला आजही खूप मोठा वाव आहे आणि हीच समाधानाची बाब असल्याची पुस्ती त्यांनी जोडली. गुंतवणूकदारांचा कल स्थावर मालमत्ता सोने आदी भौतिक गुंतवणूक साधनांकडून बँके ठेवी, म्युच्युअल फंड आदी आर्थिक साधनांकडे वळल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

मागील तीस महिन्यांत म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेत ८६ टक्के वृद्धी झाल्याचे त्यांनी नमूद करतानाच समभाग गुंतवणुकीबाबत गुंतवणूकदारांत जागरूकता आली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. समभाग गुंतवणूक करणाऱ्या योजनांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असलेला निधीचा मोठा ओघ गुंतवणूकदारांच्या मानसिकतेत झालेले बदल अधोरेखित करतो असेही ते म्हणाले.

जोमदार स्पर्धाही आवश्यक – अजय त्यागी

म्युच्युअल फंडाच्या मालमत्तांपैकी ६५ टक्के मालमत्ता आघाडीच्या ५ फंड घराण्यांकडे, तर ८५ टक्के मालमत्ता केवळ १० फंड घराण्यांकडे असणे याबाबत सर्व संबंधितांनी गांभीर्याने विचार करावा, असा सल्ला भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’चे अध्यक्ष अजय त्यागी यांनी या परिषदेला संबोधित करताना दिला. मोजकी सात फंड घराणी या उद्योगातील ६० ते ७० टक्के नफा कमावून जातात, हे या उद्योगात स्पर्धात्मकता नसल्याचे द्योतक आहे, याकडे त्यागी यांनी लक्ष वेधले. स्पर्धा असेल तर गुंतवणूकदारांनाही त्याचे लाभ मिळतील, त्यातून वसूल केले जाणारे शुल्क (एक्सेन्स रेशो) वाजवी पातळीवर येऊ शकेल, असे त्यांनी सू्चित केले. ‘अ‍ॅम्फी’ने म्युच्युअल फंडात मध्यस्थाला वगळून गुंतवणूक करण्याबाबत जागरूकता आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यागी यांनी केले. ज्यांना गुंतवणुकीतील धोके समजतात त्यांच्यासाठी मध्यस्थाला वगळून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सहज साध्य असायला हवे असे सांगतानाच, जे गुंतवणूकदार प्रगल्भ नाहीत त्यांनी मध्यस्थाची मदत घेण्यात गैर नाही, असेही ते म्हणाले.