देशातील म्युच्युअल फंडातील गुंतवणूक निधी (गंगाजळी) मे २०१४ अखेर १० लाख कोटींपल्याड गेली असून त्यात आघाडीच्या फंड घराण्यांच्या प्रायोजक समूहातील कंपन्यांची गुंतवणूकही लक्षणीय फुगली असल्याचे दिसून येते. आधीच्या एप्रिल महिन्यात अव्वल पाच म्युच्युअल फंडांमध्ये समूहातील कंपन्यांची गुंतवणूक १३ टक्के ते ६० टक्के फरकाने वाढल्याचे आढळून आले आहे.
देशातील अग्रणी फंड घराणे एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांमध्ये समूहातील कंपन्यांची गुंतवणूक सरलेल्या मे महिन्यात तब्बल १७ टक्क्यांनी वाढून ६,४६२ कोटींवर गेली आहे. त्यापाठोपाठ आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडात (१६ टक्के) आणि बिर्ला सन लाइफ आणि रिलायन्स म्युच्युअल फंडात (प्रत्येकी १२ टक्के) समूहातील कंपन्यांच्या गुंतवणुकीची मात्रा वधारल्याचे दिसते. समूहातील कंपन्यांच्या गुंतवणुकीत मे महिन्यात दोन टक्क्यांची घट केवळ यूटीआय म्युच्युअल फंडात अपवादात्मक दिसली आहे. एलआयसीसह तीन बडय़ा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी प्रायोजित केलेल्या फंड घराण्यांच्या विविध योजनांमध्ये या प्रायोजकांची गुंतवणूक ३,०६९ कोटी रुपयांवर आली आहे.