मेअखेर राबविलेल्या मेगा सेल मोहिमेसाठी मिंत्रा या ई-कॉमर्स व्यासपीठाने तमाम ग्राहकांची क्षमा मागितली आहे. ३० व ३१ मे रोजी आपल्या संकेतस्थळावर अनेक खरेदीदारांची निराशा झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. तांत्रिक अडथळ्यांमुळे कंपनीच्या संकेतस्थळावर अनेकांना पुरेशी खरेदी करता आली नाही, याबद्दल आम्ही दिलगिर आहोत, असे मिंत्राने स्पष्ट केले आहे. याबाबत संकेतस्थळाला उपरोक्त दिवशी भेट देणाऱ्या काहींनी अन्य समाज माध्यमांवर आपले तक्रारवजा अनुभव नोंदविले होते. कंपनीने मेच्या अखेरच्या दोन दिवसात विविध वस्तू खरेदीवर तब्बल ८० टक्क्य़ांपर्यंतची सवलत देऊ केली होती. पंधरवडय़ापूर्वी मोबाईलवर उपलब्ध झालेल्या मिंत्राच्या अ‍ॅपचे एक कोटींहून अधिक ‘डाऊनलोड’धारक झाल्याचा दावाही कंपनीने केला आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये फ्लिपकार्टनेही अशाच तऱ्हेची दिलगिरी व्यक्त केली होती. त्यावेळी ‘बिग बिलियन डे सेल’ मोहिम राबविणारी फ्लिपकार्ट ही याच मिंत्राची प्रवर्तक कंपनी आहे. या माध्यमातून १० कोटी डॉलरचा महसूल जमा करणाऱ्या फ्लिपकार्टला खरेदीदारांच्या निराशाजनक अनुभवांना सामोरे जावे लागले होते.