सेन्सेक्स, निफ्टीमध्ये सत्पाहारंभी घसरणव्यापार

नव्या सप्ताहाची सुरुवात भांडवली बाजाराने नकारात्मक केली. सेन्सेक्ससह निफ्टीही सोमवारी किरकोळ घसरले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या मंगळवार, २ फेब्रुवारीच्या पतधोरणामुळे व्याजदराशी निगडित समभागांवर आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी दबाव जाणवला.

४५.८६ अंश घसरणीसह सेन्सेक्स २४,८२४.८३ वर तर ७.६० अंश नुकसानासह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,५५५.९५ वर स्थिरावला. व्यवहारात २५ हजाराच्या वर गेलेला सेन्सेक्स दिवसअखेर या टप्प्यापासूनही ढळला.

रिझव्‍‌र्ह बँकेचे चालू आर्थिक वर्षांतील सहावा द्विमासिक पतधोरण आढावा मंगळवारी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन हे जाहीर करणार आहे. वाढत्या महागाईच्या पाश्र्वभूमीवर यंदा व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी वर्तविली जात आहे. त्यातच मोदी सरकारचा २०१६-१७ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प चालू महिनाअखेरिस संसदेत सादर होणार असल्याने तूर्त व्याजदर कपात टाळली जाईल, असा अर्थतज्ज्ञ, वित्तसंस्था, कंपन्यांचा अंदाज आहे.

चीनमधील निर्मिती क्षेत्र जानेवारीमध्ये ४९.४ टक्क्य़ांपर्यंत रोडावल्याची चिंताही येथील बाजारावर उमटली. शेजारील देशाचा या क्षेत्रातील हा गेल्या तीन वर्षांचा तळ निर्देशांक ठरला. याउलट भारतातील जानेवारीमधील निर्मिती क्षेत्र गेल्या चर महिन्याच्या वरच्या टप्प्यावर पोहोचल्याचे बाजारात फारसे स्वागत होताना दिसले नाही. पेक्षा रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर स्थिर ठेवण्याबाबतची अटकळच अधिक व्यक्त झाली.

नव्या आठवडय़ाची सुरुवात तेजीसह करणारा सेन्सेक्स व्यवहारात २५ हजार पार होताना सत्रात २५,००२.३२ पर्यंत वाढला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती तंत्रज्ञान निर्देशांक सर्वाधिक, १.४० टक्क्य़ांनी घसरला.

मिड, स्मॉल कॅपमध्ये मात्र तेजी

मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक मात्र ०.५ टक्क्य़ांपर्यंत वाढले. चीनच्या चिंतेने आशियातील हाँग काँग, सिंगापूर, शांघाय येथील प्रमुख निर्देशांक १.७८ टक्क्य़ांपर्यंत घसरले. तर युरोपातील बाजारांची सुरुवातही नरमच होती