सुधीर जोशी

सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रीय सकल उत्पादनातील मोठी घट व त्याहूनही गंभीर अशा सीमेवरील तणावाच्या बातमीने बाजारातील प्रमुख निर्देशांकांना दोन टक्क्यांहून अधिक, तर मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांकांना पाच टक्क्यांचा तडाखा बसला. नंतरच्या दिवसांत बँकांव्यतिरिक्त सर्व निर्देशांक सावरले. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असलेल्या दूरसंचार कंपन्यांकडून ‘एजीआर’ थकबाकीबाबतचा वाद व करोनाकाळासाठी दिलेल्या कर्ज हप्ते स्थगितीवरील व्याज आकारणीबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याचा परिणाम बँकिंग, वित्त क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर झाला. याचिकेच्या निर्णयाचा परिणाम बँकांच्या व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर, परिणामी नफ्यावर होणार असल्याने बँकांचे समभाग शेवटच्या दिवशी कोसळले.

जैवरूपी (बायोसिमिलर) औषधांसाठी प्रसिद्ध बायोकॉन कंपनीने मधुमेहावर उपचार करण्यासाठी सेमग्ली हे औषध अमेरिकन बाजारपेठेत सादर केले. या कंपनीच्या ऑगिव्हरी या कर्करोगावरील औषधाला अमेरिकन औषध संचालनालयाची (FDA) याआधीच मान्यता मिळाली आहे. अशा अनेक जैवरूपी औषधांची मालिका ही कंपनी टप्प्याटप्प्याने सादर करत आहे. या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांनादेखील टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करता येईल.

वाहनांच्या दोन वर्षांतील मागणीचा घटता आलेख व टाळेबंदीमुळे ठप्प झालेले वाहन उत्पादन पूर्वपदावर येऊ लागले आहे. खासगी चारचाकी, दुचाकी प्रवासी वाहने व ट्रॅक्टरच्या ऑगस्ट महिन्यातील विक्रीचे आकडे वाढल्यामुळे मारुती सुझुकी, एस्कॉर्टच्या समभाग मूल्यांत सुधारणा नोंदली गेली. वाहनांचे सुटे भाग पुरविणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे चांगले दिवस आहेत. गॅब्रिअल इंडिया, सुप्राजित इंडस्ट्रीज, सिएट टायरसारख्या कंपन्यांना नवीन, जुन्या वाहनांच्या डागडुजीसाठी लागणाऱ्या सुटय़ा भागांच्या वाढत्या मागणीचादेखील फायदा होईल.

हनिवेल ऑटोमेशन इंडिया ही भांडवली वस्तू उद्योग क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीने त्यांच्या उत्पादनांच्या चमूत मोठे बदल केले आहेत. भविष्यात कंपनी सॉफ्टवेअर इंडस्ट्रियल बिझिनेस मॉडेलवर लक्ष केंद्रित करणार असून कोविड-१९ नंतर अन्न उत्पादन, प्रक्रिया उद्योग, आरोग्य निगासारख्या उद्योग व्यवसायात स्वयंचलित परिचालन कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरतेमुळे तेल आणि इंधन उद्योग क्षेत्रात नवीन प्रकल्प आले नाही तरी त्याची भरपाई करण्यासाठी कंपनीने व्यवसायाचे केंद्र तेल आणि रासायनिक खत उद्योगाकडून अन्न प्रक्रिया आणि आरोग्य निगा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण नजीकच्या काळात फायद्याचे ठरेल.

दीर्घ मुदतीकडे लक्ष ठेवून बाजारात असणारी तेजी व नजीकच्या काळात अर्थव्यवस्थेची असणारी नाजूक अवस्था यामुळे बाजारावर कुठल्याही नकारात्मक बातमीचा त्वरित परिणाम होतो; पण तो टिकतोदेखील अल्प काळ. अशा मोठय़ा पडझडीच्या दिवशी आपल्या पोर्टफोलियोचा आढावा घेऊन त्यामधील उणीव समभाग हेरून व बाजार वर येईल तेव्हा त्यामधील गुंतवणूक कमी करत भरून काढावी. सध्याच्या परिस्थितीत बाजारात असे मोठे चढउतार होतील. त्यामध्ये संधी शोधता आली पाहिजे.

sudhirjoshi23@gmail.com