गुंतवणूकदारांकडून अधिमूल्यासह निधी उभारणाऱ्या दोन हजार कंपन्यांना करतगाद्याच्या नोटिसा

नवकल्पना घेऊन उद्योगक्षेत्रात नवोन्मेषी वाटचाल करणाऱ्या आणि ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेतून केंद्र आणि राज्य सरकारांकडून जोराशोराने पाठबळ मिळालेल्या नवउद्यमींनी बाळसे धरण्याआधीच त्यांच्यावरील कराचा फास आवळण्याचे प्रयत्न सरकारकडूनच सुरू झाले आहेत. केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाने २०१३ सालापासून साहसी भांडवल उभारणाऱ्या तब्बल २,००० हून अधिक नवउद्यमींना नोटिसा पाठविल्या असून, गुंतवणूकदारांना प्रदान करण्यात आलेल्या अधिमूल्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

या नोटिसा म्हणजे पहिल्या फेरीत अधिमूल्यास निधी उभारणाऱ्या नवउद्यमींच्या समभागांचे मूल्यांकन ओसरल्याचे दिसल्यास, त्यांनी ३३ टक्के दराने करभरणा करावा अर्थात त्यांच्या मानगुटीवर ‘एंजल टॅक्स’चे भूत बसविण्याच्या प्राप्तिकर विभागाच्या गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांचाच नव्याने सुरू झालेला पाठपुरावा मानला जात आहे. वस्तू आणि सेवा करातून अपेक्षेपेक्षा कमी महसूल येत असल्याने तिजोरीवर ताण पडत असलेल्या केंद्रातील सरकारच्या दृष्टीने हा नवीन कर म्हणजे महसुलाचा अतिरिक्त स्रोतच ठरणार आहे.

केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाने प्राप्तिकर विभागाच्या नोटिसांच्या धर्तीवरच खुलासा नवउद्यमींकडून मागवून, ‘एंजल टॅक्स’बाबत अनुकूलताच दर्शविली आहे. नवउद्यमी कंपन्यांना मिळत असलेल्या मूल्यांकन आणि त्यांच्याद्वारे गुंतवणूकदारांकडून उभारला जात असलेल्या निधीने कंपनी व्यवहार मंत्रालयाला वेगळा विचार करण्यास भाग पाडले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विशेषत: पहिल्या फेरीत निधी उभारणी केल्यावर, मूल्यांकनांत एकदम घसरण दिसून आलेल्या कंपन्या कर-कचाटय़ात येतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

नवउद्यमींना त्यांच्या निधी-उभारणीच्या व्यवहाराचा तपशील सादर करण्यास सांगण्याबरोबरच, अधिमूल्यासह समभागांचे वितरण, त्याचप्रणाणे अधिमूल्य निर्धारित करण्याच्या निकषांबाबत कंपनी व्यवहार मंत्रालयाने विचारणा केली आहे.

केंद्र सरकारने जानेवारी २०१७ मध्ये स्टार्टअप इंडिया योजनेचे लोकार्पण करताना, नवउद्यमींसाठी तीन वर्षांसाठी प्राप्तिकरातून सवलत, साहसी भांडवली गुंतवणुकीला भांडवली लाभ करातून मोकळीक, परमिटराजपासून मुक्तता, सरकारी खरेदीत अग्रक्रम अशा सुविधांची घोषणा केली आहे.

अनेक नवउद्यमी कंपन्यांनी या करतगाद्याच्या नोटिसांविरोधात कायदेशीर लढय़ाचा मार्ग अनुसरला आहे. नवउद्यमी कंपन्यांना मिळणारे मूल्यांकन हे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. मुळातच या कंपन्यांची मार्गक्रमणा अगदी नव्या दमाच्या कल्पना आणि न चोखाळल्या गेलेल्या वाटेवर असल्याने भविष्यातील मिळकतीचे संकेत हा मूल्यांकनातील प्रधान घटक असतो, असे एका साहसी भांडवलदार संस्थेने नावाचा उल्लेख टाळण्याच्या अटीवर सांगितले.

‘एंजल टॅक्स’ काय?

* देशात आजवर विकसित झालेला नवउद्यमी प्रवाह हा बहुतांश देवदूत बनून पुढे आलेल्या ‘एंजल इन्व्हेस्टर्स’च्या गुंतवणुकीमुळे आहे. सुरुवात करताना, एंजल गुंतवणूकदारांकडून नवउद्यमी कंपन्यांत दोन पट अधिमूल्यासह बीज भांडवल गुंतवणूक समभाग मिळविले असे गृहीत धरले, तर दुसऱ्या फेरीत साहसी भांडवलदारांनी त्याच अधिमूल्यासह पंरतु आणखी मोठा निधी गुंतवून कंपनीच्या समभागांवर मालकी मिळविली. पुढे भांडवलाची गरज म्हणून कंपनी नव्या गुंतवणूकदारांकडे गेल्यास, तिला आधी वितरित समभागांच्या तुलनेत निम्मेच अधिमूल्य राखून समभाग देऊन निधी उभारण्याचा प्रसंग ओढवला, असे मानू या. या स्थितीत कंपनीच्या समभागांचे अधिमूल्य हे शेवटच्या गुंतवणूकदारांना चुकत्या केलेल्या मूल्याच्या आधारे गृहीत धरले जाईल आणि प्रारंभिक एंजल गुंतवणूकदारांमागे कर-तगादा लागेल, असा सरकारने बजावलेल्या नोटिसांचा अन्वयार्थ आहे.