गेल्या काही महिन्यांपासून अनेक गैरव्यवहार समोर येत आहेत. उदा. PMC Bank, ILFS इत्यादी. या सर्व गैरव्यवहारात त्या – त्या संस्थेचे संचालक आणि त्यांचे सनदी लेखपाल यांच्या कामगिरीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आपल्यापैकी काहीजण कंपनी, सोसायटी, पतपेढीमध्ये संचालक असू शकतात किंवा एखाद्या सेवाभावी संस्थेत विश्वस्त असू शकतात. अशा प्रकारच्या हुद्दय़ावरील व्यक्तींनी आपली कर्तव्ये योग्य तऱ्हेने निभावली नाही तर त्या संस्थेशी संबधित सर्व हितसंबंधांना धोका निर्माण होतो. अनेक वेळेस संचालक पद किंवा विश्वस्त पद देऊ करताना त्या पदाला अनुसरून असणाऱ्या कर्तव्यांची फारशी चर्चा होत नाही. कंपनी कायदा २०१३ मधील कलम १६६ या बद्दल विस्तारपूर्वक माहिती दिली आहे.

आपण काम करत असलेल्या संस्थेत जर संचालक योग्य कर्तव्ये बजावत नसतील तर त्यावर अंकुश ठेवणे आपले कर्तव्य आहे. तसेच आपल्या उद्योगामध्ये आपण स्वत: ही कर्तव्ये पार पाडली तर आपला उद्योग अधिक बहरेल यात शंका नाही.

१. अनेकांचे हितसंबंध :

विविध हितसंबंधांमधील संतुलन कुठल्याही व्यवसायात अनेक लोकांचे हितसंबंध गुंतलेले असतात. उदा. कर्मचारी, गुंतवणूकदार, कर्ज देणारे, पुरवठादार, ग्राहक, पर्यावरण, आजूबाजूचा परिसर, शासन इत्यादी. कुठल्याही एका हितसंबंधाचं रक्षण करताना दुसऱ्या कोणावरही अन्याय होऊ  शकतो. उदा. नफा मिळवताना पर्यावरणाचा ऱ्हास किंवा कर्मचारी वर्गाला कमी मानधन देऊ न नफा वाढविणे इत्यादी.

जेव्हा मुंबईतील उद्योग जमिनीच्या किंमती वाढल्यामुळे मुंबई बाहेर गेले तेव्हा काही कापड उद्योगांनी आपल्या कामगारांची नीट काळजी घेतली नाही. भोपाळ दुर्घटनेमध्ये पर्यावरण आणि सभोवतालच्या वस्तीमधील जनता या दोघांना खूप मोठय़ा प्रमाणात हानी झाली.

कुठल्याही व्यवहारात ‘वाजवीपणा’ आवश्यक आहे. कुठल्याही एका हितसंबंधांचा प्रभाव इतर हितसंबंधांवर होतो; मात्र तो प्रमाणाबाहेर होणार नाही याची दक्षता संचालकाने घ्यावी.

शिवाय प्रत्येक हितसंबधिताना हाताळताना प्रत्येक व्यक्ती प्रामाणिकपणे आणि संस्थेच्या हितासाठी वागेल त्याप्रमाणे धोरण (Policy) आखले पाहिजे.

२. आवश्यक काळजी, कौशल्य आणि खबरदारी :

कुठलाही व्यवहार करताना जबाबदारी दिल्यानंतर त्याची योग्य तपासणी करणे आवश्यक आहे. अंधविश्वास केवळ धार्मिक बाबतीत नसून तो आर्थिक व्यवहारातदेखील पाहायला मिळतो. अन्यथा एकाच उद्योगाला भरमसाठ कर्ज PMC bank ‘ने दिले नसते, असे म्हणायला वावगे ठरणार नाही.

प्रत्येक संचालकाची ही जबाबदारी आहे की, आपले कर्तव्य बजावताना आवश्यक काळजी घेतली पाहिजे आणि कौशल्य वापरले पाहिजे. आजकालच्या काळात तंत्रज्ञान कौशल्यही काळाची गरज बनली आहे आणि ते कौशल्य उद्योगात आणलेच पाहिजे म्हणजे उद्योगाला बऱ्याच पटीने फायदा होईल.

प्रत्येक संचालकाकडे सगळी कौशल्य नसली तरी संचालक मंडळात अशा विविध कौशल्याची योग्य मिश्रण आहे की नाही हे भागधारकांनी/संचालकांनी बघावे.

संचालक मंडळात उत्पादन, तंत्रज्ञान, कायदा, आर्थिक, मनुष्यबळ विकास, संवाद इत्यादी विषयातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असेल तर योग्य कौशल्यापासून संचालक मंडळ आणि कंपनी वंचित राहणार नाही.

३. वैयक्तिक हितसंबंधांना दुय्यम दर्जा :

‘तळे राखी तो पाणी चाखी’ अशी म्हण आहे. जर संचालक संस्थेचे तळे राखताना पाणी चाखत असेल; अशा संस्था संकटात जाऊ  शकतात. संचालक मंडळातील प्रत्येक व्यक्तीने संस्थेच्या हितसंबंधांना कायम प्राधान्य देणे आवश्यक आहे. अन्यथा संस्था संकटात जाऊ  शकते.

याचा अर्थ संचालकाने मानधन न घेता काम करावे असे कोणी म्हणणार नाही. पण संस्थेबरोबरच्या वैयक्तिक आर्थिक व्यवहारासंबंधी निर्णय घेताना संचालकांनी तटस्थ भूमिका घ्यावी आणि कुठल्याही परिस्थितीत त्या व्यवहारात वाजवीपणा असावा. तसेच संचालकांचा त्या संस्थेच्या स्पर्धेत असणाऱ्या दुसऱ्या संस्थेत हितसंबंध नसावेत.

४. कायदा आणि घटनेतील कलमांचे पालन :

प्रत्येक संचालकाने त्या संस्थेसंबंधित असणाऱ्या सर्व कायद्याचे आणि संस्थेच्या घटनेचे पालन करणे आवश्यक आहे. घटना म्हणजे Memorandum & Articles of Association किंवा Trust Deed इत्यादी. वरील नमूद केलेली कर्तव्ये केवळ संचालकच नव्हे तर व्यवसाय/उद्योग करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पाळली तर उद्योग बहरेल आणि उद्योगाशी निगडित सर्व संबंधित व्यक्ती समाधानी व आनंदी राहतील.

(लेखक कंपनी सचिव आहेत.)

makarandjoshi@mmjc.in