उत्पादित तेल हल्दिया शुद्धीकरण प्रकल्पात पाठविणार; राज्यात महसूल व रोजगारवाढीची अपेक्षा

अशोकनगर : केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेन्द्र प्रधान यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्य़ातील तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन क्षेत्राचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे देशाच्या तेल उत्पादन नकाशावर प्रथमच या राज्याचे नाव आले आहे.

कोलकात्यापासून ४७ किलोमीटर अंतरावर असलेल्या अशोकनगर तेल आणि वायू साठय़ातून उत्पादन सुरू झाले असून, उत्पादित तेल हल्दिया येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पात पाठविले जाईल, अशी माहिती प्रधान यांनी दिली.

महानदी-बंगाल-अंदमान खोऱ्यात असलेल्या अशोकनगरमध्ये २०१८ मध्ये तेलसाठा आढळला होता. येथून तेल उत्पादन करणे व्यावसायिकदृष्टय़ा फायद्याचे ठरणार असल्याचे लक्षात आल्यानंतर कामाला सुरुवात झाली.

या तेलक्षेत्रामुळे राज्याच्या उत्पन्नात वाढ होणार असून नोकरीच्या अनेक संधीही उपलब्ध होतील, असे प्रधान यांनी सांगितले.