दसरा आणि दिवाळी येताच नेमेचि येणाऱ्या प्रथेप्रमाणे ई-व्यापार संकेतस्थळांवर खरेदी उत्सव आणि नजराण्यांना शनिवारपासून सुरुवात होत आहे. खरे तर खरेदीत्सुक ग्राहकांसाठी ही सणोत्सव सुरू झाल्याची वर्दीच ठरली असून, वाढती स्पर्धा आणि कुरघोडीसाठी चढाओढीतून यंदा या ई-पेठेत अधिक चांगल्या ऑफर्सचा नजराणा ग्राहकांसाठी खुला होऊ घातला आहे. बहुतांश संकेतस्थळांनी गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विभागाकडे लक्ष केंद्रित केले असून त्या विभागात अधिक सवलती देऊ केल्या आहेत.

अ‍ॅमेझॉनची ‘द ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ ही खरेदी जत्रा १ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे, तर फ्लिपकार्टची ‘बिग बिलियन डे २०१६’ आणि स्नॅपडीलची ‘अनबॉक्स दिवाळी सेल’ खरेदी जत्रा २ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत योजण्यात आली आहे. यंदा ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी जाणवू नये यासाठी सर्वच ई-पेठचालकांनी विशेष काळजी घेतली आहे. तर वस्तू घरपोच देण्यासाठी अधिक मनुष्यबळ सज्ज ठेवण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. वस्तूंवर मिळणाऱ्या ऑफर्ससोबतच अ‍ॅमेझॉनने यंदा ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’ची तीन महिन्यांची नोंदणी मोफत देऊ केली आहे. तर फ्लिपकार्टने मोफत सभासद होण्याची संधी ग्राहकांना खुली करून दिली आहे.

स्नॅपडीलने नुकतेच स्नॅपडील गोल्डची घोषणा केली असून त्याद्वारे ग्राहकांना अतिरिक्त ७० टक्के सवलत मिळवणे शक्य होणार आहे.

गृहोपयोगी विभागातील उपकरणांकडे विशेष लक्ष

ई-व्यापार संकेतस्थळावरील ‘होम अ‍ॅण्ड किचन’ या विभागात उत्सवाच्या काळात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे अ‍ॅमेझॉनचे संचालक सुमित सहाय यांनी स्पष्ट  केले. या विभागात वर्षांला १६५ टक्क्यांची सरासरी वाढ दिसून येत असून अ‍ॅमेझॉनच्या या विभागातील मागणीत १७० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सहाय यांनी नमूद केले. या विभागात अ‍ॅमेझॉनचे ४५ हजार विक्रेते असून, बडय़ा ब्रॅण्डससोबतच लघु उद्योजकांचाही यात समावेश आहे. उत्सव काळात या विभागातील उत्पादनांना विशेष मागणी असते यामुळे या विभागाकडे विशेष लक्ष पुरविण्यात आल्याचे सहाय यांनी नमूद केले. महाराष्ट्रातून या विभागात खरेदी केलेल्या वस्तूंपैकी ४० टक्के वस्तू या मुंबईतून मागविल्या जात असल्याचे अ‍ॅमेझॉनने स्पष्ट  केले. यामध्ये साठवणुकीचे डबे, स्वयंपाकघरातील साधने अशा उत्पादनांना मागणी असल्याचेही अ‍ॅमेझॉनने स्पष्ट केले.