२०१९ मध्ये अवघ्या १६ कंपन्यांमार्फत १२,३६२ कोटींची उभारणी

मुंबई : निर्देशांकांचे ऐतिहासिक टप्पे गाठणाऱ्या भांडवली बाजारात प्रारंभिक खुल्या भागविक्रीच्या माध्यमातून होणारी कंपन्यांची निधी उभारणी यंदा मात्र तब्बल ६० टक्क्यांनी रोडावली आहे.

चालू वर्षांत आतापर्यंत या माध्यमातून १२,३६२ कोटी रुपये निधी उभारणी झाली आहे. तुलनेत आधीच्या वर्षांत, २०१८ मध्ये ही रक्कम ३०,९५९ कोटी रुपये होती.

वर्ष २०१९ मध्ये १६ कंपन्यांनी प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया राबविली. गेल्या वर्षांत ही संख्या तब्बल २४ होती. याबाबतची ताजी आकडेवारी ‘प्राइम डाटाबेस’ने गुरुवारी जाहीर केली.

प्रारंभिक खुल्या भागविक्रीच्या माध्यमातून कंपन्या भांडवली बाजारात प्रवेश करण्यासह निधी उभारणी व कंपनीची सूचिबद्धता करतात. प्रत्यक्षात सेबीने २०१९ करिता ४७ कंपन्यांना ५१,००० कोटी रुपये प्रारंभिक खुल्या भागविक्रीच्या माध्यमातून उभारण्यास परवानगी दिली. जवळपास सात वर्षांच्या तळात पोहोचलेल्या चालू वित्त वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनाचा परिणाम कंपन्यांच्या निरुत्साही निधी उभारणीवर झाल्याचे मानले जाते.

प्रारंभिक खुल्या भागविक्रीच्या माध्यमातून २०१७ मध्ये ३६ कंपन्यांनी ६७,१४७ कोटी रुपये निधी उभारणी केली. आधीच्या वर्षांत ही संख्या २६ व रक्कम २६,४९४ कोटी रुपये होती. २०१४ मध्ये अवघ्या ५ प्रारंभिक खुल्या भागविक्रीच्या माध्यमातून केवळ १,२०१ कोटी रुपये कंपन्यांनी जमविले.

चालू वर्षांत स्टर्लिग अँड विल्सन सोलरने सर्वाधिक २,८५० कोटी रुपये उभे केले. आयआरसीटीसी, उज्जिवन स्मॉल फायनान्स बँक, सीएसबी बँक, अ‍ॅफल, पॉलिकॅब, निओजेन केमिकल्स, इंडियामार्ट इंटरमेश यांच्या प्रारंभिक खुल्या भागविक्री प्रक्रियेला १० पटींहून अधिक प्रतिसाद मिळाला.

भांडवली बाजारात सूचिबद्ध झालेल्या १५ कंपन्यांपैकी ७ कंपन्यांनी गुंतवणूकदारांना १० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर आयआरसीटीसीने सर्वाधिक १२८ टक्के परतावा दिला आहे. केवळ २ कंपन्यांची प्रारंभिक खुली भागविक्री जाहीर केलेल्या समभाग किमतीपेक्षा कमी स्तरावर झाली.

‘ऑफर फॉल सेल’ व गुंतवणूकदार संस्थांमार्फत मात्र भांडवली बाजारातील निधी ओघ २०१९ मध्ये थेट २८ टक्क्यांनी वाढून ८१,१७४ कोटी रुपयांवर गेला आहे. २०१८ मधील ही रक्कम ६३,६५१ कोटी रुपये होती. या माध्यमातून २०१७ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक १,६०,०३२ कोटी रुपयांची निधी उभारणी झाली आहे.

भांडवली बाजारात लघू व मध्यम उद्योगांसाठी निधी उभारणी मंच सुरू झाल्यापासून, गेल्या पाच वर्षांत प्रथमच या गटातील कंपन्यांची प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया कमी झाली आहे. या मंचावर अवघ्या ५० कंपन्यांनी ६२१ कोटी रुपये उभे केले. तुलनेत गेल्या वर्षी १४१ कंपन्यांनी २,२८७ कोटी रुपयांची प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया पार पाडली होती.