जुलैमध्ये देशांतर्गत वाहन विक्रीत प्रवासी वाहन श्रेणीने विक्रीतील वाढ नोंदविली आहे; या कालावधीत भारतातील दुचाकींची विक्री मात्र रोडावली आहे. गेल्या महिन्यात प्रमुख कंपन्यांच्या प्रवासी कारची विक्री १७.४७ टक्क्य़ांनी वाढून ती १,६२,०२२ झाली आहे. तर मोटरसायकल विक्री मात्र जुलैमध्ये ६.३६ टक्क्य़ांनी रोडावली आहे. ती जुलै २०१४ च्या ८,६३,१८८ वरून यंदा ८,०८,३३२ वर आली आहे. जुलै २०१४ मध्ये प्रवासी कारची १,३७,९२२ विक्री झाली होती.
देशातील प्रमुख वाहन विक्री उत्पादकांची संघटना असलेल्या ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स’ (सिआम) ने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये एकूण दुचाकी विक्री ०.१४ टक्क्य़ांनी घसरत ती १३,००,४५७ वर आली आहे. वाणिज्यिक वापरासाठीची वाहने गेल्या महिन्यात ८.४१ टक्क्य़ांनी वाढून ५१,७९५ झाली आहेत. तर जुलैमधील एकूण वाहन विक्री १६,१९,७७१ झाली आहेत. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील १५,९७,४९३ वाहनांच्या तुलनेत ती यंदा १.३९ टक्क्य़ांनी वाढली आहे.
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत टाटा मोटर्स, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्रसह अनेक आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांनी नफ्यातील कमालीची घसरण नोंदविली आहे.
टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी टाटा मोटर्सच्या भागधारकांच्या बैठकीत कंपनी आपल्या ताफ्यात अधिक वाहनांना सामावून घेईल, असे घोषित केले होते.
तर गेल्याच आठवडय़ात मुंबईत झालेल्या महिंद्र समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी, समूह गेल्या काही दिवसांपासून घसरत्या वाहन विक्रीचा सामना करत असून चालू आर्थिक वर्षांतील उर्वरित कालावधीत कंपनी आणखी नवी वाहने सादर करेल, असे स्पष्ट केले होते.
येत्या आठवडय़ापासून सुरू होत असलेल्या यंदाच्या सणांच्या हंगामापासून वाहन क्षेत्राला वाढीव विक्रीची अपेक्षा आहे.

टोयोटा किलरेस्कर मोटरने इटिऑस श्रेणीतील विशेष वाहन सोमवारी दिल्लीत सादर केले. हॅचबॅक श्रेणीतील या प्रवासी वाहनाची किंमत ७.८२ ते ८.९२ लाख रुपये (एक्स शो रुम-नवी दिल्ली)आहे. पेट्रोल व डिझेल अशा दोन इंधन प्रकारावर धावणारी ही कार निवडक रंगांमध्येच विशेष श्रेणींतर्गत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टाटा समूहातील लॅन्ड रोव्हरची बहुप्रतिक्षित डिस्कव्हरी स्पोर्ट ही प्रिमियम गटातील एसयूव्ही येत्या महिन्यात भारतात सादर केली जाणार आहे. या वाहनासाठीची नोंदणी सुरू झाली असून २ सप्टेंबर रोजी ती प्रत्यक्ष दालनांमधून उपलब्ध होईल, अशी माहिती जग्वार लॅन्ड रोव्हर इंडियाचे अध्यक्ष रोहित सुरी यांनी सोमवारी मुंबईत दिली.

गेल्या आठवडय़ात मारुती सुझुकीची एस-क्रॉस तर तत्पूर्वी ह्य़ुंदाईच्या क्रेटाने वाहन क्षेत्रातील हालचाल नोंदविली आहे.