मुंबई : निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापकांना लवकरच प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आणि ठरावीक समभागांच्या यादीत गुंतवणूक करण्याला लवकरच परवानगी दिली जाईल, असे या क्षेत्राची नियामक असलेल्या ‘निवृत्तिवेतन निधी नियामक व विकास प्राधिकरण (पीएफआरडीए)’चे अध्यक्ष सुप्रतिम बंडोपाध्याय यांनी पत्रकारांशी बोलताना मंगळवारी स्पष्ट केले.

ही गुंतवणूक विशिष्ट अटी-शर्तीसह केली जाईल आणि या गुंतवणुकीसंबंधाने लवकरच मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा केली जाईल, अशी पुस्तीही बंडोपाध्याय यांनी जोडली. निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापकांना  प्रारंभिक भागविक्री म्हणजेच आयपीओ, एफपीओ आणि ओएफएसच्या विशिष्ट मर्यादेच्या पुढे असणाऱ्या प्रस्तावांमध्येच गुंतवणूक करण्याची परवानगी असेल, असेही त्यांनी सूचित केले. सध्या समभागसंलग्न गुंतवणुकीवर अनेक प्रकारचे निर्बंध असतानाही, राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) सुरुवात केल्यापासून, वार्षिक सरासरी ११.३१ टक्के दराने परतावा दिला आहे.

सदस्य संख्येत वाढीच्या उद्दिष्टासह, विद्यमान २०२१-२२ आर्थिक वर्षांअखेपर्यंत १० लाख कोटी रुपयांच्या निवृत्तिवेतन गंगाजळीचे लक्ष्य असल्याचे बंडोपाध्याय यांनी स्पष्ट केले. सध्या म्हणजे, १० जुलै २०२१ पर्यंत, अटल पेन्शन योजना आणि एनपीएस या दोन प्रमुख निवृत्तिपश्चात तरतुदीसाठी लोकांसाठी खुल्या असलेल्या गुंतवणूक योजनांमार्फत एकूण ६.२ लाख कोटी रुपयांची गंगाजळी उभी केली आहे.