केवळ एका ‘पीएमसी’ बँकेत झालेल्या गैरप्रकारामुळे देशातील संपूर्ण सहकार क्षेत्रावर ताशेरे ओढणे गैर असून उलट नव्याने सुरू झालेल्या लघू वित्त बँकांमधील नजीकच्या काळातील आर्थिक गैरव्यवहारांची नोंद घ्यावी, अशी अपेक्षा ‘नॅफकॅब’ व ‘को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया’चे संचालक प्रा. संजय जी. भेंडे यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासक मंडळाचे सदस्य व नागपूर नागरिक सहकारी बँक या बहुराज्यीय सहकारी बँकेचे अध्यक्ष असलेल्या प्रा. भेंडे यांनी ‘स्टेट बँके’ने नुकत्याच सुचविलेल्या बहुराज्यीय नागरी सहकारी बँकांच्या खासगीकरणाच्या उपाययोजनांबाबतही निषेध व्यक्त केला आहे.

याबाबतचा अहवाल सादर करणाऱ्या स्टेट बँके’च्या संशोधकांना रिझव्‍‌र्ह बँक अथवा केंद्रीय अर्थ खात्याने अधिकृत निश्चित केलेले नाही; तसेच या संशोधकांनी, सहकारी क्षेत्राने ग्रामीण भागात केलेल्या आर्थिक योगदान तसेच शहरी क्षेत्रातील लघू व मध्यम उद्यमी, मध्यम वर्गाला आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मौन बाळगल्याबद्दलही भेंडे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचे प्रत्यक्ष नियंत्रण सर्व बँकांवर असूनदेखील अनेकांमध्ये गैरव्यवहार झालेले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सहकार क्षेत्रात कार्यरत असलेले कार्यकर्ते या सर्व त्रुटींची पूर्तता करुन अधिक सक्षम व जनसामान्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारे सहकार क्षेत्र उभारण्यासाठी कटीबध्द आहेत.