नवी दिल्ली : वर्षभरापूर्वी जवळपास १,००० कोटी रुपयांचा तोटा नोंदविणाऱ्या देशातील पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) या सार्वजनिक बँकेने जूनअखेरच्या तिमाहीत तेवढय़ाच रकमेचा नफा कमावला आहे. बँकेची अनुत्पादित मालमत्ताही यंदा कमी झाली आहे.

हिरे व्यापारी नीरव मोदी थकीत कर्ज प्रकरणात मोठे नुकसान सहन करणारी पीएनबी चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत नफा नोंदवेल, असा विश्वास अध्यक्ष सुनील मेहता यांनी गेल्याच महिन्यात व्यक्त केला होता.

कर्जसमस्या निपटाऱ्याकरिता बँकेने केलेल्या उपाययोजनेमुळे जून २०१९ अखेरच्या तिमाहीत १,०१८.६३ कोटी रुपयांचा नफा झाल्याचे सांगितले जाते. बँकेला एप्रिल ते जून २०१८ दरम्यान ९४० कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

गेल्या एकूण वित्त वर्षांत बँकेला ४,७४९.६४ कोटी रुपयांचा तोटा झाला होता, तर यंदाच्या पहिल्या तिमाहीत बँकेचे उत्पन्न वाढून ते १५,१६१.७४ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. मार्च २०१८ अखेर बँकेला १५,०७२.४१ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले होते.

यंदाच्या तिमाहीत बँकेच्या ढोबळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण वर्षभरापूर्वीच्या १८.२६ टक्क्यांवरून १६.४९ टक्क्यांपर्यंत स्थिरावले आहे, तर निव्वळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाण १०.५८ टक्क्यांवरून ७.१७ टक्क्यांपर्यंत आले आहे.

विलीनीकरणानंतरही बँक ऑफ बडोदाची नफाक्षमता कायम

दोन सार्वजनिक बँकांना विलीन करून घेतल्याचा लाभ बँक ऑफ बडोदाला झाला आहे. स्टेट बँकेनंतरची दुसरी मोठी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने जून २०१९ अखेरच्या तिमाहीत ८२६.१३ कोटी रुपयांचा नफा नोंदविला आहे. तो वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ६४५.७१ कोटी रुपयांहून अधिक आहे. बँक ऑफ बडोदात गेल्या तिमाहीपासून याच क्षेत्रातील देना बँक व विजया बँकेचे  विलीनीकरण झाले आहे.