दोन दिवसाच्या प्रवासात २० हजाराला गवसणी घालणाऱ्या मुंबई शेअर बाजाराने सप्ताहअखेर या टप्प्याला गाठलेच. तब्बल १०० दिवसानंतर २० हजारावर पोहोचणाऱ्या सेन्सेक्सबरोबरच निफ्टीनेही ६,१०० नजीक जाताना गेल्या २८ महिन्याच्या वरचा स्तर पार केला. जागतिक शेअर बाजारातील तेजी आणि स्थानिक कंपन्यांचे तिमाही निकालाची जोड मिळणाऱ्या शेअर बाजारात आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी कमालीचा उत्साह पहायला मिळाला. बुधवारी सत्राच्या व्यवहारात सेन्सेक्सने २० हजाराला स्पर्शिले होते. मात्र बंद होताना तो या पातळीपेक्षा कमी अंशांवर बंद झाला होता.
कालप्रमाणेच आजही २० हजारावर खुला झालेला मुंबई शेअर बाजारात सुरुवातीला घसरत्या औद्योगिक उत्पादन दराने चिंता निर्माण केली. मात्र ते फारसे गंभीर न घेता सेन्सेक्स लगेचच दिवसाच्या २०,११९.१४ या उच्चांकाला पोहोचला. दिवसअखेर तो कालच्या तुलनेत १४३.५८ अंश वाढ नोंदविता झाला असला तरी त्याचा आजचा २०,०८२.६२ हा बंद स्तर गेल्या साडेतीन वर्षांच्या वरच्या टप्प्यावरचा होता. सेन्सेक्सचीही २०१३ मधील ही सर्वात मोठी पातळी आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराने ६,१०० नजीक जाताना जानेवारी २०११ नंतर प्रथमच उंची स्तर गाठला आहे. गेल्या २८ महिन्यातील हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा सर्वात वरचा टप्पा आहे.
वाहन, ग्राहकोपयोगी वस्तू, बँक या क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. आयटीसी, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, ओएनजीसी या कंपन्यांचे समभाग मूल्य उंचावले. सेन्सेक्समधील ३० पैकी १८ समभाग वधारले होते. दरम्यान, दोन्ही प्रमुख भांडवली बाजारात शनिवारी चाचणीसाठी विशेष व्यवहार होणार आहेत. त्यानंतर सोमवारी अक्षय तृतियेनिमित्ताने गोल्ड ईटीएफसाठी विस्तारित व्यवहार होणार आहेत.

जपानमध्ये शिंझो एबे यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून या देशाच्या अर्थविषयक धोरणात लवचिकता आली आहे. याचाच परिणाम म्हणून येन हे जगातील प्रमुख चलनाच्या तुलनेत घसरत आहे. एबे हे जपानमध्ये २% महागाईचे उद्दिष्ट ठेवून धोरणे आखत आहेत. त्या देशानेदेखील दीर्घकालीन व्याजदर कमी करण्याचे पाऊल उचलले आहे. याचाच परिणाम म्हणून बँक ऑफ जपानने २,००० अब्ज येन किंमतीच्या रोख्यांची खरेदी करणार असल्याचे जाहीर केले आहे. जागतिक महायुद्धानंतरची सर्वात मोठी रोखे खरेदी यामाध्यमातून होणार आहे. जपानी अर्थव्यवस्था निर्यातप्रधान असल्यामुळे कमकुवत येनचा फायदा उठवत जागतिक व्यापारात जपानचा हिस्सा राखण्यास मदत होत आहे.
– सुप्रिया शांडिल्य, अर्थतज्ज्ञ.