साठेबाजी र्निबधानंतरही तीन महिन्यांत आयात वाढणार
अवघ्या महिन्याभरात किलोला २०० रुपयांच्या वर गेलेले तूर डाळीचे दर पंधरवडय़ावर येणाऱ्या दिवाळीत कमी होण्याची शक्यता निर्माण झाली असून सरकारच्या साठेबाजी र्निबधानंतरही येत्या तीन महिन्यांत २५ लाख टन डाळ देशात येऊ घातली आहे.
ऐन सणांच्या हंगामाच्या तोंडावर महिन्याभरापूर्वी ८० रुपये किलो असणाऱ्या तूर डाळीचे दर सध्या २०० रुपये किलो दरम्यानपर्यंत पोहोचले आहे. डाळीचा अतिरिक्त साठा केल्यामुळे महागाई वाढत असल्याचे पाहून महाराष्ट्र शासनाने आयात डाळींवर रविवारपासून र्निबध आणले. त्याचबरोबर साठेबाजांवर कारवाई व अतिरिक्त साठय़ाची जप्ती आदी उपाययोजना करण्यात येत आहेत.
मात्र देशात केवळ तूर डाळीचेच दर वाढत असून स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची उपलब्धता कमी असल्यामुळे हे घडत असल्याचे डाळींचे व्यवहार करणाऱ्या व्यापारी संघटनेने म्हटले आहे. कॅनडा, आफ्रिकासारख्या देशातून आयात डाळीचा पुरवठा तीन महिन्यात होईल, असा विश्वासही देण्यात आला आहे.
याबाबत ‘इंडिया पल्सेस अ‍ॅन्ड ग्रेन्स असोसिएशन’ (आयपीजीए) चे अध्यक्ष प्रविण डोंगरे यांनी सांगितले की, १५ ऑक्टोबर २०१५ ते ३१ जानेवारी २०१६ दरम्यान भारतात २५ लाख टन डाळ आयात होणार असून आठवडय़ापूर्वीच २.५ लाख टन डाळ ही मुंबईच्या बंदरात आली आहे. या डाळींचा तीन महिन्यात पुरवठा होणार असून पंधरवडय़ात किंमती कमी होतील, असा दावा त्यांनी केला.
आयात डाळींच्या साठय़ावर महाराष्ट्र शासनाने टाकलेले र्निबध (३५० टनपर्यंत) हे जाचक असून ते त्वरित हटविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. साठेबाजीविरुद्धची कारवाईनंतरही डाळींच्या किंमती कमी होण्याची शक्यता कमी असून मुळात पुरवठा योग्य रितीने होण्याची गरज यावेळी प्रतिपादन करण्यात आली.
देशातील डाळीचे उत्पादन ३० टक्क्य़ांनी वाढले तरी भारत हा डाळ निर्यातदार देश होऊ शकतो, असा विश्वास डोंगरे यांनी व्यक्त केला.
‘ग्लोबल पल्सेस कॉन्फडरेशन’चे अध्यक्ष हुसैन अर्सलान यांनी भारतात डाळींच्या किंमती वाढण्यास उत्पादन ही समस्या नसून त्याचे वितरण ही बाब असल्याचे नमूद केले.
तीन महिन्यात आयात होणाऱ्या डाळींमध्ये १० लाख टन मटार, मसूर व चणा प्रत्येकी ५ लाख टन व ५ लाख टन तूर (१.५० लाख टन), मूग व उडीद यांचा समावेश असल्याची माहिती यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष बिमल कोठारी यांनी दिली. एकूण आयात डाळींचे मूल्य ६,००० कोटी रुपयांचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

२६० हेक्टर : भारतातील डाळीचे लागवड क्षेत्र
२३० लाख टन : देशातील डाळीची गरज
२५ लाख टन : तूर डाळीला मागणी
भारतातील डाळ उत्पादन
२०१५-१६ : ७०.५० लाख टन (अंदाज)
२०१४-१५ : १७२ लाख टन
२०१३-१४ : १९२.५० लाख टन

१४० रुपये प्रति किलो दराने
सरकारला डाळ पुरवठा करणार
डाळींचे वाढते दर तसेच डाळीची कमी उपलब्धता या पाश्र्वभूमीवर सरकारलाच प्रति दिन एक लाख किलो तूर डाळ देण्याची तयारी ‘आयपीजीए’ने दाखविल्याचे अध्यक्ष डोंगरे यांनी सांगितले. १३४ ते १४० रुपये प्रति किलो या दराने ही डाळ सरकारला सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गरजूंना उपलब्ध करून देता येईल, असेही ते म्हणाले.