रिझव्‍‌र्ह बँकेची दर स्थिरता; आधीच्या कपातीचे लाभ कर्जदारांपर्यंत पोहचत नसल्याबद्दल खंत
महागाईतील संभाव्य वाढीपोटी दक्षता बाळगत, स्थिर व्याजदराचे पाऊल उचलावे लागलेल्या रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेच्या उभारीचे सुस्पष्ट संकेत मिळत असल्याचे प्रतिपादन मंगळवारी येथे केले. मात्र असे असूनही रेपो दरातील १.२५ टक्का कपातीचे निम्म्याने लाभही कर्जदारांपर्यंत बँकांनी पोहोचविले नसल्याबद्दल त्यांनी स्पष्ट शब्दांत खंत व्यक्त केली.
आणखी दोन महिने महागाईचा दर उंचावता राहणार असून त्याबाबत मध्यवर्ती बँक अधिक दक्ष असल्याचे चालू आर्थिक वर्षांच्या पाचव्या द्विमासिक पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँकेने सांगितले. या पतधोरणात रेपो दरासह सर्व प्रमुख व्याजदर स्थिर ठेवण्याचे अपेक्षित पवित्राच मध्यवर्ती बँकेने दाखविला. तथापि गव्हर्नरांनी देशातील महागाई दराबाबत तसेच अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबतचा आपला यापूर्वीचाच अंदाज कायम ठेवला.
तुटीच्या व अनियमित मान्सूनचा परिणाम कृषी उत्पादनावर होण्यासह रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणासाठी आवश्यक किरकोळ महागाई दर आणखी वाढण्याची भीती राजन यांनी व्यक्त केली. जानेवारी २०१६ पर्यंतचे महागाई दराचे लक्ष्य ६ टक्के आहे आणि मार्च २०१७ मध्ये ते ५ टक्क्यांचे आहे. मात्र नजीकच्या जानेवारीतील अपेक्षित पातळीपल्याड महागाई भडकण्याचे संकेत त्यांनी दिले.
याचबरोबर रिझव्‍‌र्ह बँकेच्या आगामी पतधोरणातील कल हा सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हची महिनाअखेरची बैठक तसेच मोदी सरकारचा आगामी अर्थसंकल्प यावर निर्भर असेल, असेही राजन यांनी सुचविले. २०१५ मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेने आतापर्यंत १.२५ टक्का दर कपात केली आहे. चालू वर्षांतील शेवटची व्याजदर कपात सप्टेंबर २०१५ मध्ये अध्र्या टक्क्याची झाली आहे. बँकेचे आगामी पतधोरण २ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.
ऑक्टोबरमधील ५ टक्के नोंदलेला किरकोळ महागाई दर हा गेल्या चार महिन्यातील सर्वोच्च राहिला आहे. तर घाऊक महागाई दर अद्यापही उणे स्थितीत आहे. चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन उंचावत ७.४ टक्क्यांवर गेले आहे.

किरकोळ किंमतींवर आधारीत महागाई दर आणखी दोन महिने चढा राहण्याची शक्यता आहे. अन्नधान्य व इंधनादी घटक वगळता गेल्या दोन महिन्यांत अन्य वस्तूंच्या वाढत्या किमती चिंताजनक आहे. वाढणाऱ्या महागाईबाबत रिझव्‍‌र्ह बँक दक्ष असून नजीकच्या भविष्यात जेव्हा महागाईबाबत योग्य वातावरण जाणवेल तेव्हा निश्चितच दर कपात केली जाईल. फेब्रुवारीनंतर असे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे.
’ रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन

ल्ल रिझव्‍‌र्ह बँकेच्या मंगळवारच्या स्थिर पतधोरणाद्वारे अत्यंत समतोल दृष्टिकोन राखला गेल्याचे दिसून येते. विकासाला चालना देण्याबरोबरच महागाईवरील नियंत्रणाचा प्रयत्न यातून निश्चितच ह ोईल. महागाईवर नियंत्रण राखणे हेच रिझव्‍‌र्ह बँकेचे सध्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. आर्थिक सुधारणेकरिता सरकारद्वारे केले जात असलेल्या विविध उपाययोजनांमुळे चालू आर्थिक वर्षांत ७.५ टक्के विकास दर गाठला जाईल.
’ शक्तिकांता दास
केंद्रीय अर्थव्यवहार सचिव

चिंताजनक बनलेल्या चलनवाढीला आवर घालण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेची पडणारी पावले ही भारतीय अर्थव्यस्थेकरिता सकारात्मक असून महागाईबाबत निश्चित केलेले उद्दिष्ट साधण्याकरिता मध्यवर्ती बँक कायम दक्ष असेल, अशी आशा करायला हरकत नाही.
’ अत्सी शेट
मूडीज इन्व्हेस्टर्स सव्‍‌र्हिसेसच्या सह-व्यवस्थापकीय संचालिका

रिझव्‍‌र्ह बँकेच्या मुख्यालयात मंगळवारी द्विमासिक पतधोरण सादर करताना गव्हर्नर रघुराम राजन (मध्यभागी), डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान आणि ऊर्जित पटेल. छाया : गणेश शिर्सेकर