घाऊक विक्रेता साखळी दालने चालविणाऱ्या मेट्रो कॅश अॅण्ड कॅरी इंडियाने आपले नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून राजीव मेंडिरत्ता यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. जून २०१० पासून हा पदभार सांभाळत असलेल्या राजीव बक्षी यांच्याकडून त्यांनी १ फेब्रुवारीपासून सूत्रे स्वीकारली. मेंडिरत्ता हे यापूर्वी अमेरिकेत वॉलमार्टमध्ये उपाध्यक्ष (र्मचडाइजिंग) या पदावर कार्यरत होते. वॉलमार्टने भारतात प्रवेशासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांत वॉलमार्ट इंडिया या कंपनीचे मुख्य परिचालन अधिकारी अशी त्यांच्याकडे जबाबदारी होती.

अॅक्झाल्टाचा भारतात गुंतवणूकवाढीचा मानस
मुंबई : जागतिक स्तरावरील कोटिंग उद्योगातील कंपनी जर्मनीस्थित अॅक्झाल्टाने येत्या काळात आपल्या निर्माण क्षमतांमध्ये विस्तारासाठी भारतात गुंतवणूक करण्याचा मानस व्यक्त केला आहे. कंपनी आपले शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (१५० वर्षे) साजरे करीत असून, जर्मनीसह ब्राझील, चीन, मेक्सिको आणि भारत या प्रमुख केंद्रांवर लक्ष्य निर्धारित करण्याचे तिने ठरविले आहे. कंपनीने चीनमध्ये आशिया-पॅसिफिक तंत्रज्ञान केंद्राचे बांधकाम सुरू केले आहे. रंग तंत्रज्ञानामधील विविध प्रयोगांच्या आधारे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यावर भर असलेल्या अॅक्झाल्टाचा भारतात नवीन प्रादेशिक ब्रॅण्ड्स सुरू करण्याचाही मानस आहे.

‘व्हॅल्वोलाइन’चा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव
मुंबई : वर्ष १८६६ मध्ये स्थापन झालेल्या व्हॅल्वोलाइन या अमेरिकी कंपनीने आपल्या कारभाराचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव भारतात धडाक्यात साजरा करण्याची अधिकृत घोषणा येथे केली. या निमित्ताने संपूर्ण २०१६ सालात अनेकविध उपक्रम आणि कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत, अशी घोषणा या निमित्ताने खास भारत दौऱ्यावर आलेले व्हॅल्वोलाइनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक क्रेग मॉगलर यांनी केली. पेट्रोलियम उद्योगातील हे पहिले अमेरिकन ट्रेडमार्कधारक ब्रॅण्ड आहे.