१ फेब्रुवारीपर्यंत उत्तराधिकारी निवडण्याचे रिझव्‍‌र्ह बँकेचे फर्मान

येस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारपदावर राणा कपूर यांना मुदतवाढ  देण्यास नकार देताना रिझव्‍‌र्ह बँकेने त्यांचा उत्तराधिकारी नियुक्त करण्यास १ फेब्रुवारी २०१९ पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेची यापूर्वीची मुदत २९ जानेवारी २०१९ होती. ती सप्टेंबर २०१९ पर्यंत विस्तारण्याची मागणी बँकेने केली होती. नव्या आर्थिक वर्षांचा ताळेबंद, वार्षिक सर्वसाधारण सभा आदी कारणे देत कपूर यांना तूर्त पदावर कायम ठेवण्याचा आग्रह बँकेने धरला होता. वारसदाराच्या शोधार्थ येस बँकेने अंतर्गत समितीही नेमली आहे. मात्र  सर्व प्रक्रिया १ फेब्रुवारी २०१९ पर्यंत पूर्ण करून बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नवी नियुक्ती जाहीर करण्याचे रिझव्‍‌र्ह बँकेचे फर्मान आहे.

मुख्याधिकारीपदाची ऑगस्ट २०१८ मध्ये मुदत संपल्यानंतर बँकेच्या संचालक मंडळाने राणा कपूर यांनाच पुढील तीन वर्षांसाठी कायम ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. बँकेत १०.६६ टक्के भांडवली हिस्सा असलेले कपूर २००४ पासून या पदावर आहेत. आयसीआयसीआय बँकेचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक व मुख्याअधिकारी संदीप बक्षी यांचा कार्यकालही पाच वर्षांवरून तीन वर्षांपर्यंत कमी करण्याचा आदेश रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारीच दिला आहे.

यापूर्वी अ‍ॅक्सिस बँकेच्या शिखा शर्मा यांच्या मुदतवाढीसही रिझव्‍‌र्ह बँकेने नकार दिला आहे. सलग दोन वर्षे प्रत्येकी १०,००० कोटी रुपयांहून अधिकची अनुत्पादित कर्जे राहिल्याचे कारण या दोन्ही मुख्याधिकाऱ्यांची मुदत न वाढविण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने दिले आहे.