मुंबई : मुख्य कार्यकारी अधिकारीपदाच्या विस्तारित कालावधीवर रिझव्‍‌र्ह बँकेने मर्यादा आणलेल्या खासगी क्षेत्रातील आघाडीच्या येस बँकेच्या संचालक मंडळाची मंगळवारी बैठक होत आहे. याबाबतची माहिती बँकेने भांडवली बाजाराला यापूर्वी दिली आहे. या बैठकीत विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. एचडीएफसी या खासगी वित्त समूहातून काही दिवसांपूर्वी बाहेर पडलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे कपूर यांच्या उत्तराधिकारी स्पर्धेत आघाडीवर आहेत.

कपूर यांना ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यास नकार देणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेने जानेवारी २०१९ पर्यंत नवा मुख्याधिकारी शोधण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी निर्णय घेण्यासाठी मंगळवारी बँकेच्या संचालक मंडळाची मंगळवारी बैठक बोलाविण्यात आली आहे. कपूर हे बँकेचे २००४ पासून मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ऑगस्ट २०१८ मध्ये मुदत संपल्यानंतर ती २०२१ पर्यंत – तीन वर्षांसाठी वाढविण्याचा बँकेच्या प्रयत्नाला रिझव्‍‌र्ह बँकेने आक्षेप घेतला आहे. कपूर यांना जानेवारी २०१९ पर्यंतच या पदावर राहता येईल, असे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

राणा कपूर व कुटुंबियांचा बँकेत १०.६६ टक्के हिस्सा आहे. राणा कपूर यांचे ज्येष्ठ बंधू अशोक कपूर यांचे २००८ मध्ये निधन झाल्यानंतर राणा कपूर यांच्याकडे बँकेची सूत्रे आली.

बँकेचा समभाग सोमवारी ०.३५ टक्क्य़ांनी रोडावत मुंबईच्या शेअर बाजारात सत्रअखेर २२६.२५ वर स्थिरावला.

जून २०१८ अखेर बँकेच्या ढोबळ अनुत्पादित व निव्वळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण अनुक्रमे १.३१ व ०.५९ टक्के राहिले आहे. बँक क्षेत्रात हे प्रमाण सर्वात कमी आहे.