व्यवसाय विस्तारासाठी आवश्यक भांडवली निकड ही खुल्या बाजारातून निधी उभारून भागविण्यावर अतिरिक्त भिस्त ठेवण्यावर रिझव्‍‌र्ह बँकेने सार्वजनिक बँकांना काहीसे सावध केले आहे. भांडवली बाजारातील भाऊगर्दी पाहता बँकांनी हा मार्ग टाळावा, असे आवाहन रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी केले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सरकारने नुकतेच १२,००० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देऊ केले आहे. बँकांच्या वाढत्या अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण पाहता अर्थसंकल्पातील ७,९४० कोटी रुपयांच्या तरतुदीपेक्षा ही रक्कम किती तरी अधिक आहे.
बँकांसाठी अतिरिक्त भांडवली गुंतवणूक ही नेहमीच स्वागतार्ह राहिली आहे; मात्र सध्या या मार्गाद्वारे निधी उभारणी करणे काहीसे जोखमीचे ठरू शकते, अशी साशंकता गांधी यांनी व्यक्त केली आहे. बझेल ३ च्या पूर्ततेसाठी बँकांना येत्या चार वर्षांत मोठय़ा प्रमाणात निधी उभारणी करावी लागणार, हे मान्य, असे नमूद करून गांधी यांनी भांडवली बाजाराव्यतिरिक्त अन्यही पर्याय बँकांनी जोपासावेत, असे सुचविले.
निधी उभारणीसाठी सर्व बँकांनी एकत्र येऊन एखादे धोरण ठरविणे आवश्यक असल्याचेही गांधी म्हणाले. भांडवली बाजारातून निधी उभारणीसाठीही बँका समभागांच्या किमतीतील सुधाराची अपेक्षा करीत असल्याचे ते म्हणाले.
बँकांना बझेल ३ अंतर्गत मार्च २०१९ पर्यंत अतिरिक्त २.५ लाख कोटी रुपये उभारायचे आहेत. मार्च २०१५ अखेर बँकांच्या अनुत्पादक मालमत्तेचे व पुनर्बाधणी केलेल्या कर्जाचे एकत्रित प्रमाण १०.३० टक्के नोंदले गेले आहे.