मालमत्ता खरेदीत वॉशिंग्टनही मागे

वाढत्या अतिश्रीमंत लोकसंख्येच्या यादीत मुंबईचा क्रमांक २१वा असून, मुंबईने यामध्ये वॉशिंग्टन डी. सी. आणि टोरंटो या शहरांना मागे टाकले आहे. सर्वात महागडी मोक्याची निवासी मालमत्ता खरेदी करण्यामध्ये इस्तनाबूल, मेलबोर्न, दुबईपेक्षाही मुंबईचा क्रमांक वरचा आहे. वाढत्या संपत्तीबाबत भविष्यातील आशास्थान म्हणून जगातील ४० महत्त्वाच्या शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक ११ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

८९ देशांतील सुमारे १२५ शहरांबाबत ‘संपत्ती अहवाल २०१७’चा अहवाल जागतिक पातळीवरील मालमत्ता क्षेत्रातील नाईट फ्रँक या कंपनीने बुधवारी जाहीर केला. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. श्रीमंत भारतीयांकडून येत्या दोन वर्षांत निवासी मालमत्तांमध्ये ४० टक्के तर परदेशातील मालमत्तांमध्ये २५ टक्के गुंतवणूकही केली जाण्याची शक्यता असल्याचेही या अहवालात नमूद आहे. स्वत:चे घर असावे यासाठी या श्रीमंत भारतीयांनी सिंगापूर, युनायटेड किंगडम, अरब अमिराती, अमेरिका या देशांना पसंती दिली आहे. जगभरातील श्रीमंत मात्र युरोपीयन देशांपेक्षा अग्रक्रम देतात.

नाईट फ्रँक इंडियाच्या संशोधन विभागाचे राष्ट्रीय संचालक डॉ. सामंतक दास यांच्या मते, स्थावर मालमत्ता क्षेत्रात आलिशान कार्यालयांमध्ये या श्रीमंत व्यक्तींना रस असून त्यात तीनपटीने वाढ झाली आहे.

भारतातील बांधकाम व्यवसाय सध्या आर्थिक चणचणीत असतानाही श्रीमंत भारतीय गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. त्यांना परदेशातील स्थावर मालमत्ता क्षेत्रात गुंतवणूक करण्यातही रस असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तीन कोटी डॉलर्स किंवा त्यापेक्षा अधिक संपत्ती असलेल्या ५०० भारतीयांची प्रत्येक वर्षी यादीत भर पडत होती. ती पुढील दहा वर्षांत दुप्पट होईल, असा विश्वासही डॉ. दास यांनी व्यक्त केला आहे.