करोना व्हायरसंनं जगभरात थैमान घातलं आहे. करोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. तर सर्वत्र उद्योगधंदेही ठप्प आहेत. अशा परिस्थितीत रिलायन्स इडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत तब्बल १.३३ लाख कोटी रूपयांची घट झाली आहे. यानंतर आता ते जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत १७ व्या स्थानावर घसरले आहेत. सोमवारी जारी करण्यात आलेल्या एका अहवालात याबाबत माहिती देण्यात आली.

करोनाच्या पार्श्वभूमीत जगभरात उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे अनेकांना कोट्यवधींचं नुकसान सोसावं लागत आहेत. मुकेश अंबानी यांच्या सपत्तीतही तब्बल २८ टक्क्यांची घट झाली आहे. तर दोन महिन्यांच्या कालावधीत ३१ मार्चपर्यंत त्यांना तब्बल २ हजार १०० कोटी रूपयांचा झटका लागला आहे. यानंतर त्यांच्याकडे ३.३६ लाख कोटी रूपयांची संपत्ती राहिली आहे. या कालावधीत मात्र चीनच्या काही उद्योगपतींच्या संपत्तीत मात्र वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जगातील पहिल्या १०० श्रीमंतांच्या यादीत चीनमधील आणखी ६ उद्योगपती जोडले गेले आहेत

या यादीत सामिल असलेल्या अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्ती ४२ हजार कोटी रूपयांची म्हणजेच ३७ टक्क्यांची घट झाली आहे. तर एचसीएलचे प्रमुख शीव नाडर यांच्या संपत्तीत ३५ हजार कोटी रूपयांची आणि कोटक बँकेचे उदय कोटक यांच्या संपत्तीत २८ हजार कोटी रूपयांची घट झाली आहे. अंबानींव्यतिरिक्त अन्य सर्व भारतीय प्रमुख १०० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर गेले आहेत. करोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांमध्ये शेअर बाजारातही २५ टक्क्यांची घट झाली आहे.