तेल व वायू उत्खनन, ऊर्जा, पेट्रोरसायने, दूरसंचार, किरकोळ विक्री अशा आपल्या विविध व्यवसायस्वारस्यांमध्ये आगामी तीन वर्षांत तब्बल १.५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकींचे नियोजन असल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गुरुवारी भागधारकांपुढे बोलताना केली. जगातील पहिल्या पाच पेट्रोरसायन कंपन्यांमध्ये स्थान मिळविण्याचे स्वप्न भागधारकांना दाखविण्याबरोबरच, वर्षभरात आपली प्रदीर्घ काळची मनीषा असलेल्या ४जी दूरसंचार सेवा ‘रिलायन्स जिओ’चे देशभरात टप्प्याटप्याने अनावरण आणि किरकोळ विक्रीचे दालन रिलायन्स रिटेलच्या महसुलात चार पटीने वाढीचा विश्वासही अंबानी यांनी व्यक्त केला. देशांतर्गत केजी-डी६ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून वायू उत्पादन घटले असले तरी, पूर्व किनारपट्टीवरील नव्याने सापडलेल्या साठय़ातून भविष्यात मोठे उत्पादन आणि अमेरिकेतील शेलगॅस व्यवसायातून ही कसर भरून काढली जाईल, असा दिलासाही जगातील या सर्वात श्रीमंत ऊर्जासघन उद्योगपतीने भागधारकांना दिला.
‘‘आगामी तीन वर्षांत सर्व व्यवसाय शाखांमध्ये एकाच वेळी १५०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची आपली कटिबद्धता आहे. रिलायन्सच्या नव्हे तसेच देशाच्या उद्योगविश्वाच्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक व विस्तार योजना आपण हाती घेतली आहे,’’अशा शब्दात मुकेश अंबानी यांनी केलेल्या या घोषणेचे भागधारकांनीही टाळ्यांचा गजर करून स्वागत केले. या प्रसंगी प्रेक्षकवर्गात त्यांची माता कोकिलाबेन अंबानी, पत्नी नीता अंबानी आणि मुलेही बसली होती.
गेल्या वर्षी ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना, आगामी पाच वर्षांत १,००,००० कोटी रुपयांची गुंतवणूक व्यवसाय विस्तारावर केली जाईल, अशी अंबानी यांनी घोषणा केली होती. या गुंतवणूक रकमेत ५०,००० कोटींचा विस्तार करण्याबरोबरच, कालावधी तीन वर्षांपर्यंत कमी करण्यात येत असल्याचे अंबानी यांनी स्पष्ट केले.
ठळक घोषणा
* पेट्रोकेमिकल व्यवसायाची क्षमता सध्याच्या १५ दशलक्ष टनांवरून २५ दशलक्ष टनांवर जाईल.
* पॉलिएस्टर उत्पादनक्षमता १५ लाख टनांवरून ४० लाख टनांवर जाईल
* २०१५ पर्यंत मध्य प्रदेशच्या सोहागपूर येथे कोल-बेड मिथेन उत्पादन प्रकल्प
* १०,००० कोटींची उलाढाल साध्य करणारी ‘रिलायन्स रिटेल’ वार्षिक ५० टक्के दराने महसूल वृद्धी करेल आणि ४०,००० कोटीची विक्री उलाढाल गाठेल.
* ‘रिलायन्स जिओ’ या ४जी दूरसंचार सेवेत चालू वर्षांत ७,००० नवीन कर्मचारी भरती होऊन एकूण मनुष्यबळ १० हजारांवर जाईल.