मोफत कॉल व इंटरनेट सेवा देणाऱ्या नवागत रिलायन्स जिओचा दूरसंचार क्षेत्रात स्थिरावलेल्या स्पर्धकांना चांगलाच फटका बसला आहे. आयडिया सेल्युलर, रिलायन्स कम्युनिकेशन्सने तर यापोटी पहिलाच तिमाही तोटा त्यांच्या ताळेबंदात नोंदविला आहे.

२०१६-१७च्या ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान आयडिया सेल्युलरने ३८३ कोटी रुपयांचा तोटा नोंदविला आहे. आदित्य बिर्ला समूहातील या दूरसंचार कंपनीला या रूपात गेल्या १० वर्षांत प्रथमच तोटय़ाला सामोरे जावे लागले आहे.

रिलायन्स जिओचे मुख्य प्रवर्तक मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन्सदेखील स्वस्त दूरसंचार दर सुनामीतून सावरलेली नाही. कंपनीने गेल्या तिमाहीत ५३१ कोटी रुपयांचा तोटा सहन केला आहे.

व्होडाफोनने चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या व्यवसाय अस्तित्वातील किमान नफा नोंदविला आहे. तर एअरटेलने नफ्यातील तब्बल ५४ टक्के घसरण नोंदविली आहे. या दोन्ही कंपन्या ग्राहकसंख्येत पहिल्या दोन स्थानावर आहेत. जिओने मोफत सेवा सुरू केल्यानंतर स्पर्धक दूरसंचार कंपन्यांनी क्षेत्र नियामकाकडे तक्रार दाखल केली होती. दूरसंचार व्यवसायात रिलायन्स जिओ व्यवहार नियमितता पाळत नसल्याचा या कंपन्यांचा आक्षेप होता. आपल्या ग्राहकांसाठी आवश्यक हवाई क्षेत्र (नेटवर्क) उपलब्ध करून दिले जात नसल्याचा त्यांचा तगादा होता.

स्पर्धकांना व्हॅलेंटाइनशुभेच्छा..

प्रेमीजनांचा हक्काचा दिवस गाठून रिलायन्स जिओने आपल्या स्पर्धकांबरोबर नवी कॉर्पोरेट खेळी खेळली आहे. रिलायन्स जिओच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून मंगळवारी ‘हॅप्पी व्हेलेंटाईन’ असा निरोप एअरटेल, व्होडाफोन व आयडिया कंपन्यांना दिला गेला. एअरटेलने ‘सेम फिल्स’ तर आयडियाने ‘सेम टू यू’ अशा शब्दात रिलायन्स जिओला उत्तर दिले आहे. मोफत कॉल तसेच इंटरनेट देणाऱ्या रिलायन्स जिओमुळे स्पर्धक मोबाईल कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. परिणामी त्या रिलायन्स जिओच्या दूरसंचार व्यवहाराविरोधात आहेत.