देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओला आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या दुसऱ्या तिमाहित २ हजार ८४४ कोटी रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे. ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहित कंपनीच्या नफ्यात तिप्पट वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला ९९० कोटी रूपयांचा नफा झाला होता.

संपलेल्या आर्थिक तिमाहित रिलायन्स जिओच्या ऑपरेटिंग रेव्हेन्यूमध्ये ३३ टक्क्यांची वाढ झाली असून तो १६ हजार ५५७ कोटी रूपये इतका झाला आहे. रेल्युलेटरी फायलिंगनुसार २०१९-२० या कालावधीच्या दुसऱ्या तिमाहित कंपनीला १३ हजार १३० कोटी रूपयांचा ऑपरेटिंग रेव्हेन्यू मिळाला होता. रिलायन्स जिओनं दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या तिमाहित कंपनीचा ARPU वाढून १४५ रूपये प्रति ग्राहक झाला आहे. जून तिमाहीमध्ये तो १४०.३० रूपये प्रति ग्राहक इतका होता.

रिलायन्स जिओनं जागतिक गुंतवणुकदारांकडून आतापर्यंत १ लाख ५२ हजार ०५६ कोटी रूपयांची गुंतवणूक मिळवली असल्याचंही जिओकडून सांगण्यात आलं. यामध्ये फेसबुक, गुगल, सिल्व्हर लेक, विस्ता इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक, केकेआर, मुबादला, एडीआयए, टीपीजी, एल कॅटेट्रॉन, पीआयएफ, इंटेल कॅपिटल्, आणि क्वालकॉम व्हेचर्सचा समावेश आहे. यापूर्वी एप्रिल ते जून तिमाहिमध्ये जिओला २ हजार ५२० कोटी रूपयांचा नफा झाला होता. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत तो १८२.८ टक्के अधिक होता. जिओचा ऑपरेटिंग रेव्हेन्यूदेखील ३३.७ टक्क्यांनी वाढून १६ हजार ५५७ कोटी रूपये झाला होता.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात घसरण

दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात १५ टक्क्यांची घसरण झाली आहे. इंधन व्यवसायाचा परिणाम यावर झाल्याचं सांगण्यात येत आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहित कंपनीला ९ हजार ५६७ कोटी रूपयांचा निव्वळ नफा झाला झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला ११ हजार २६२ कोटी रूपयांचा नफा झाला होता.