रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने तिच्या जामनगर तेल शुद्धीकरण प्रकल्पातून तयार होणाऱ्या प्राणवायू पुरवठ्याची क्षमता १,००० टन करण्याचे निश्चित केले आहे. वाढत्या करोनासाथीचा सामना करावा लागणाऱ्या राज्यांना कंपनीमार्फत सध्या दिवसाला ७०० टन वैद्यकीय दर्जायुक्त प्राणवायू नि:शुल्क पुरवला जात आहे.

गुजरातमधील कंपनीच्या जामनगर प्रकल्पामध्ये सुरुवातीला १०० टन प्राणवायू तयार केला जात होता. त्याची क्षमता आता ७०० टन करण्यात आली आहे.

गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यासारख्या राज्यांना पुरविले जाणाऱ्या पुरवठ्यामुळे दररोज ७० हजार गंभीर रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात येते. वैद्यकीय वापरासाठी योग्य अशा प्राणवायूची उत्पादन क्षमता १,००० टनपर्यंत वाढवण्याची कंपनीची योजना आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कंपनीच्या या प्रकल्पात कच्च्या तेलाचे डिझेल, पेट्रोल आणि विमानाला लागणाऱ्या इंधनामध्ये जेट इंधनासारख्या उत्पादनामध्ये रूपांतर केले जाते. मात्र कंपनीने वाढत्या करोना साथप्रसारानंतर रुग्णांना आवश्यक ठरणाऱ्या प्राणवायूची मागणी पूर्ण करण्याच्या हेतूने येथे त्यासाठी उपकरणे बसविली व संबंधित प्रक्रिया स्थापित केली. वैद्यकीय वापरासाठीच्या प्राणवायूकरिता उद्योगांना लागणाऱ्या वायू वळविला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. उणे १३३ अंश सेल्सिअस तापमानावरील विशेष टँकरच्या वाहतुकीसह प्राणवायूचा संपूर्ण पुरवठा राज्य सरकारांना विनाशुल्क केला जातो, असेही सांगण्यात आले. कंपनी सामाजिक दायित्व (सीएसआर) उपक्रमाचा हा एक भाग असल्याचेही नमूद करण्यात आले.

रिलायन्सचा गुजरातमधील जामनगर येथे जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे.

सरकारी मालकीची इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) यांनीही आपल्या इंधन शुद्धीकरण प्रकल्पात तयार होणाऱ्या प्राणवायूचाही पुरवठा करण्यात येत आहे.

दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमधील विविध रुग्णालयांना विनाशुल्क १५० टन प्राणवायूचा पुरवठा सुरू करण्यात आल्याचे आयओसीने म्हटले आहे. तर बीपीसीएलने म्हटले आहे की, विनाशुल्क १०० टन प्राणवायूचा पुरवठा सुरू केला आहे.