रिझव्‍‌र्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांकडून चिंता व्यक्त

आभासी चलन हे संभाव्य आर्थिक, कायदेशीर, ग्राहक संरक्षण तसेच सुरक्षिततेच्या बाबत घातक ठरू शकतील, अशा शब्दात रिझव्‍‌र्ह बँकेने आभासी चलनाबाबत आर्थिक जोखीम व्यक्त केली आहे.

‘फिक्की’ या उद्योग संघटनेमार्फत आयोजित ‘फिन टेक’ परिषदेला रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी संबोधित केले. या वेळी त्यांनी डिजिटल, आभासी चलनाबाबतचे आपले मत व्यक्त केले.

‘फिक्की’बरोबरच ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ ही बँक व्यवस्थापन संघटना तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारी ‘नासकॉम’देखील या परिषदेची एक आयोजक होती. आभासी चलनांबाबत सायबर हॅकिंग, पासवर्ड नाहीसा होणे आदी प्रकार सर्रास संभवतात, यावरही गांधी यांनी या वेळी आपल्या भाषणात भर दिला. ग्राहक समस्या, वाद तसेच तक्रार निवारणासाठी आभासी चलनाबाबत कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नसल्याचेही ते या वेळी म्हणाले. अनेक गैरव्यवहारांसाठी या चलनाचा उपयोग केला जात असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.

बिटकॉन या आभासी चलनामार्फत सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक व्यवहार केले जातात. डिजिटल चलन हे कोणत्याही नियामक यंत्रणेमार्फत सुरू केले जात नाही, याकडे लक्ष वेधत गांधी यांनी मात्र त्याचा उपयोग एकापेक्षा अधिक व्यक्तींमार्फत, कंपन्यांद्वारे होतो, असे स्पष्ट केले. अशा आभासी चलनांसाठी कोणतीही मध्यवर्ती बँक अथवा पतधोरण नियामक यंत्रणा कार्यरत नाही, याबद्दलही त्यांनी या वेळी खेद व्यक्त केला.