वाहन उत्पादक संघटनेची भीती

राजधानी नवी दिल्लीत वाहने चालविण्यासाठी सम व विषम क्रमांकानुसार घालण्यात आलेल्या मर्यादेमुळे उलट भ्रष्टाचारच अधिक वाढेल, अशी भीती वाहन उत्पादक कंपन्यांच्या संघटनेने व्यक्त केली आहे. दिल्ली सरकारने अपुऱ्या अभ्यासाविना घेतलेला हा निर्णय असल्याचे नमूद करतानाच प्रथम सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीच्या बसना कठोर नियम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे.
‘सिआम’ ही प्रमुख वाहन उत्पादक कंपन्यांची देशव्यापी संघटना असून तिचे उपव्यवस्थापकीय संचालक सुगातो सेन यांनी सांगितले की, दिल्ली सरकारच्या अनोख्या निर्णयामुळे वाहनांची विक्री अथवा नियमितता येण्याऐवजी भ्रष्टाचाराला कुरण मिळेल. असा ‘मार्ग’ काढण्याऐवजी सरकारने सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या सार्वजनिक व्यवस्थेतील बस वाहतुकीचा अभ्यास करायला हवा.
दिल्ली परिवहन विभागाने गेल्या पाच वर्षांत एकही नवी बस खरेदी केली नाही, असे नमूद करून राजधानीतील एकूण प्रदूषणामध्ये वाहन क्षेत्राचे प्रमाण अवघे १६ टक्केच असल्याचे सेन यांनी सांगितले. नेमक्या दिवशी संबंधित क्रमांकाच्या वाहनांसाठी चालकांमध्ये आपसातच देवाण-घेवाण वाढून बनावट क्रमांक पट्टय़ा लावण्याचे प्रमाणही वाढू शकते, असेही ते म्हणाले.
चेन्नईतील पुरामुळे ठप्प पडलेल्या वाहन उद्योगाबाबत सेन म्हणाले की, गेल्या काही कालावधीतील हा दुसरा मोठा फटका आहे. उद्योग अद्यापही यातून सावरलेला नाही; सुटे भाग उत्पादकांवर त्याचा सर्वाधिक विपरीत परिणाम झाल्याचेही सेन यांनी सांगितले.
देशातील प्रवासी वाहनविक्रीबाबत यंदा दुहेरी आकडय़ातील वाढ राखता येण्याबाबत सेन यांनी शंका व्यक्त केली. नुकताच संपलेला दसरा-दिवाळीसारखा सण सोडता वर्षभरात ६ ते ८ टक्केच विक्रीतील वाढ या उद्योगाकडून राखले जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

आगामी ‘ऑटो शो’ वाढीव क्षेत्रफळावर!

मुंबई: फेब्रुवारीत ग्रेटर नोएडा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या वाहन मेळ्यासाठी यंदा प्रदर्शन स्थळाचा विस्तार करण्यात आल्याची माहिती ‘सिआम’च्या व्यापार मेळा आणि कार्यक्रम विभागाचे प्रमुख देबाशीष मझुमदार यांनी दिली. ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनासाठी यंदा ६८ हजार चौरस मीटर जागा निश्चित करण्यात आली असून या प्रदर्शनाला ६ लाख लोक भेट देतील, असेही ते म्हणाले. गेल्या प्रदर्शनाच्या तुलनेत यंदा त्याचे प्रमाण २० टक्के अधिक असेल; तसेच प्रदर्शनात ६५ हून अधिक कंपन्या सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले. वाहनाशी संबंधित सुटे भाग उत्पादकांचे प्रदर्शन याच दरम्यान नवी दिल्लीतील प्रगती मैदानात होणार आहे.